Sun, Jul 21, 2019 13:04होमपेज › Konkan › देशात रामराज्य येऊ देणार नाही : आनंदराज आंबेडकर

देशात रामराज्य येऊ देणार नाही : आंबेडकर

Published On: Dec 26 2017 2:39PM | Last Updated: Dec 26 2017 2:39PM

बुकमार्क करा

महाड : प्रतिनिधी 

रामाचे रामराज्य या देशात आपण कदापि येऊ देणार नाही असा रोखठोक विचार भारतीय बौध्दजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज महाड येथे बोलताना मांडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन महाडच्या क्रांतीभूमीत केले होते. त्या घटनेचा ९० वा वर्धापन दिन आज महाड येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. 

आनंदराज आंबेडकर म्हणाले की,‘देशात मनुवाद्यांची सत्ता असून त्यांचे दोनच अजेंडे आहेत. राममंदिर बांधणे आणि देशात रामराज्य आणणे. त्यांनी राममंदिर कुठेही बांधावे पण स्वतःच्या पत्नीचा त्याग करणाऱ्या, तिला जाळून ठार मारणाऱ्या रामाचे राज्य देशातू येऊ देणार नाही.’

आपल्या भाषणामध्ये श्री. आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला चांगलेच खडे बोल सुनावले. आपण तुकड्यांमध्ये वाटलो गेलो आहोत. मेंढरासारखे वागत असल्याने या देशात आपली सत्ता येऊ शकत नाहीत. ही स्थिती बदलायची असेल तर डोक्याने चाला. आज देशात अत्याचार वाढले आहेत, जातीयवाद वाढले आहेत, अशा स्थितीत जर आपण दुभंगलो तर आपण कपाळकरंटे ठरू असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात आपण विभागले गेलो. आपण काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे. आजची ही परिस्थिती बदलायची असेल तर भीमा कोरेगावचा इतिहास पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी १ जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने भीमा कोरेगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.

आजच्या मनुस्मृती दहन वर्धापन दिनानिमत्त महाडमध्ये विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चवदार तळे आणि क्रांतीस्तंभाचा परिसर आंबेडकरी जनतेने फुलून गेला होता. भीमसैनिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता महाड नगरपालिका आणि प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. विविध संघटनांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भीमसैनिकांच्या नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता.