Sat, Dec 07, 2019 14:52होमपेज › Konkan › रामपूर सरपंचांचा घातपात

रामपूर सरपंचांचा घातपात

Published On: Feb 09 2019 1:41AM | Last Updated: Feb 08 2019 10:54PM
चिपळूण : खास प्रतिनिधी

रामपूर येथील सरपंच श्रीया धनंजय रावराणे यांचा मृत्यू संशयास्पद असून ही आत्महत्या नाही तर तो घातपात आहे, असा संशय त्यांचा भाऊ प्रसाद प्रकाश साळवी (रा. मार्गताम्हाने) याने व्यक्‍त केला आहे. 
शुक्रवारी (दि. 8) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे  व पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली असून याबाबत पत्रकार परिषदेत साळवी कुटुंबीयांनी माहिती दिली.

शहरातील जि.प.च्या विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी श्रीया रावराणे यांच्या माहेरकडील अजित साळवी, मनोहर साळवी, गणेश साळवी, सुरेश साळवी, गजानन साळवी, यशवंत चव्हाण, अनिल साळवी, पूजा चव्हाण, सौरभ चव्हाण आदी उपस्थित होते.

साळवी कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वाश्रमीची अपर्णा साळवी हिने रामपूर येथील धनंजय रावराणे यांच्याशी प्रेमविवाह केला. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांचे पती बहिणीशी चांगले वागत नसल्याचे ती अनेकदा बोलत असल्याचे भाऊ प्रसाद याने नमूद केले आहे. पती धनंजय रावराणे याने एक विवाहित महिलेबरोबर आर्थिक व्यवहार केले आहेत. मात्र, व्यावसायिक संबंध मर्यादा सोडून गेल्याचे लक्षात येत आहे. याच कारणावरून आपल्या बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ होत असे, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तिने समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीच्या वागण्यात बदल झाला नाही. दि. 5 फेब्रुवारी रोजी तिचे पती धनंजय रावराणे यांचा दूरध्वनी आला. तिची तब्येत बरी नाही हे त्यांनी कळविले. मात्र, या घटनेला अकरा तास उलटून गेले होते तरी नेमके काय घडले हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार संशयास्पद  आहे. तिने आत्महत्या केली नसून तिला विष पाजून मारले आहे, असा साळवी कुटुंबियांनी या तक्रारीत आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेऊन चौकशी करावी व तिला न्याय द्यावा, अशी मागणी भाऊ प्रसाद साळवी यांनी केली आहे.