Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Konkan › रमजाई पुलामुळे संगलट धरण रद्द होणार?

रमजाई पुलामुळे संगलट धरण रद्द होणार?

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 10:40PMदापोली : प्रवीण शिंदे 

दापोली-खेड हद्दीवरील संगलट नदीवर 22 मीटर उंचीचे धरण बांधण्याचा घाट कोंढे ग्रामस्थांनी उधळून लावला होता. त्यामुळे त्या धरणाचे काम थांबले होते. आता त्याच रमजाई नदीवर शासनाच्या पूल दुरुस्ती योजनेतून 60 लाखांचा नदीपूल मंजूर झाल्याने संगलट - कोंढे नदीवरील धरण रद्द होणार असे दिसत आहे. 

धरणासाठी कोंढे गावातील 100 हेक्टरहून अधिक जागा पाण्याखाली जाणार होती. त्याची पुसटशी कल्पनादेखील कोंढे गावाला न देता लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी गावामध्ये सर्वेक्षण केले होते.  यामध्ये मंदिरे, शेतजमिनी आणि विहिरी या पाण्याखाली जाणार होत्या. त्यामुळे कोंढे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन काम बंद पाडले. 

रमजाई नदीवर जागा सर्वेक्षणाआधीच धरणाची मुहुर्तमेढ घालून कोंढे ग्रामस्थांना अंधारात ठेवण्यात आले होते. या धरणाचा कोंढे ग्रामस्थांना काडीमात्राचा उपयोग नसून अन्य लोकांच्या फायद्यासाठी कोंढे गावचे यामध्ये प्रचंड नुकसान करण्याचा मनसुबा ग्रामस्थांनी हाणून पाडला.याबाबत स्थानिक आमदारांनी कोंढे गावामध्ये येऊन बैठकीचे आयोजनदेखील केले होते. 

मात्र ग्रामस्थांनी राजकीय पक्षांचा आश्रय नको असे सांगून आमदारांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाने समाधानकारक बैठक झाली नाही म्हणून कोंढे गावाशी संपर्क केला नाही. धरणाच्या 22 मीटर उंचीमुळे 27 मीटरचा परिसर पाण्याखाली जाणार होता. त्यामध्ये रुखी गावाचादेखील समावेश होता. हे धरण झाले असते तर कोंढे, संगलट, उर्फी, पन्हाळेकाझी हा मार्ग कायमचा बंद झाला असता. तर कोंढेतील 6 वाड्यांना स्थलांतर करण्याची वेळ आली असती. मात्र, ग्रामस्थांनी वेळीच उठाव करुन धरण बांधकाम रोखून धरले. 

याबाबत दापोली लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क केला असता कोंढे गावामध्ये आमदारांसमवेत बैठक होणार होती. मात्र ती बैठक झाली नसल्याने धरणाचे काम थांबले आहे तर ग्रामस्थांचा विरोध असल्याने काम करता येणार नाही, असे दापोली लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर धरणाची उंची कमी करण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागांनी ग्रामस्थांसमोर ठेवला. यामध्ये कोंढे गावाचे कमी क्षेत्र जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, कोंढे गावाची एक इंचही जमीन देणार नाही आणि येथील भौगोलिक रचना बिघडवून देणार नाही, असे कोंढे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी एक पाऊल मागे घेत धरण प्रक्रियेला ब्रेक दिला आहे.