Mon, May 27, 2019 09:30होमपेज › Konkan › काँग्रेसमध्ये रमेश कदम झाले ‘अ‍ॅक्टिव्ह’

काँग्रेसमध्ये रमेश कदम झाले ‘अ‍ॅक्टिव्ह’

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 9:03PMचिपळूण : शहर वार्ताहर

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर येथील माजी आमदार रमेश कदम आता अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अनेक दिवस कदम काँग्रेसमध्ये केव्हा सक्रिय होणार? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, अखेर त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस बांधणीला सुरुवात केली असून येत्या 14 मे रोजी चिपळुणात जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली अडीच ते तीन वर्षे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसला अध्यक्ष लाभला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसची वाताहात झाली होती. माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. परिणामी, अनेक तालुकाध्यक्ष देखील निवडले गेले नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्ये मरगळ आली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आठ दिवसांपूर्वी नाणार दौर्‍यावर आले होते. यावेळी माजी आमदार कदम यांच्या जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली.

यानंतर कदम यांनी संघटनात्मक बांधणीला अग्रक्रम दिला आहे. 14 मे रोजी सकाळी 10.30 वा. शहरातील वैश्य भवन येथे जिल्हा काँग्रेसचा मेळावा होणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याचा एकत्रित मेळावा होत असल्याने काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, कार्याध्यक्ष व आ. हुस्नबानू खलिफे, जिल्हा प्रभारी विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जिल्हाभरातील आजी-माजी पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

जिल्ह्यामध्ये काँग्रेसची वाटचाल पक्षीय बांधणी, पदाधिकार्‍यांची निवड या संदर्भात काँग्रेसची दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांसोबत या मेळाव्यात चर्चा होणार आहे. काँग्रेसला मजबुती देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात असून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कदम यांनी केले आहे.