Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › दापोली मतदारसंघावर कदम यांची पकड

दापोली मतदारसंघावर कदम यांची पकड

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 25 2018 12:12AMखेड : अनुज जोशी

दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपूर्वीपासूनच शिवसेनेची पिछेहाट सुरू होती. दळवींचा राष्ट्रवादींच्या कदमांकडून झालेल्या पराभवानंतर त्यावर शिक्‍कामोर्तब झाले होते. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात दळवींवर कदम वरचढ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता सेनेचे नेते रामदास कदम यांनी राजकारणातील यशस्वी खेळी करत दळवींपेक्षाही सरस राजकीय खेळी करत पुन्हा एकदा या मतदारसंघात पकड निर्माण केली आहे.

नुकत्याच झालेल्या सेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेचे नेते व मंत्री यांनी शिवसेनेतील दळवी व राष्ट्रवादीतील कदम यांच्यावर शरसंधान साधत त्याचा प्रत्यय दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर शिवसैनिकांचे लक्ष आता ‘मातोश्री’कडे लागले असून गेल्या दहा वर्षांत राजकीयद‍ृष्ट्या कमकुवत ठरत चाललेल्या दळवींना नक्‍की काय आदेश ‘मातोश्री’तून येतो व तो दळवी मानणार का, या प्रश्‍नाचे उत्तर त्यानंतर मिळणार आहे.

खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांचा बहुतांश भाग समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपूर्वी शिवसेनेचे निर्विवादपणे वर्चस्व होते. परंतु, खेड विधानसभा मतदारसंघ गुहागर व दापोली विधानसभा मतदारसंघात विलीन झाला. त्यानंतर मात्र गुहागर व दापोली दोन्ही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेची काहीशी पिछेहाट सुरू झाली. 

गुहागर विधानसभा मतदारसंघात पराभवानंतर देखील रामदास कदम संघटनेचे एकनिष्ठपणे काम करत राहिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत खेड तालुक्यात विकासनिधीचा प्रवाह थांबला नाही. परंतु, गेल्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांत दळवी पराभूत झाल्यानंतर मात्र दापोली विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पिछेहाट सहन करावी लागली. दळवी यांनी त्यांच्या पराभवाचे खापर शिवसेनेच्याच नेत्यांवर फोडून सातत्याने स्वतःच्या कार्यशैलीला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दापोलीत नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात  शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, रामदास कदम, रवींद्र वायकर, संपर्कप्रमुख विजय कदम यांनी सूर्यकांत दळवी यांच्यावर शरसंधान साधून कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा शिवसेनेत भगवाच अधिक महत्त्वाचा असल्याचे दाखवून दिले.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी या मतदारसंघाची घडी बसवण्यासाठी त्यांचे उच्चविद्याविभूषित सुपुत्र योगेश कदम यांना सक्रिय केले आहे. त्यासाठी ‘मातोश्री’चा आदेश त्यांच्याकडे आहे. योगेश कदम यांच्या रूपाने दिवसरात्र विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे तरूण नेतृत्व आता दापोली विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांना मिळाले आहे. मात्र, स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे दळवी मात्र अद्याप योगेश कदम यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी मानसिकद‍ृष्ट्या तयार नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आलेले दळवी सातत्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची सेना नेत्यांविरोधात वक्‍तव्य करत आहेत. परंतु, नुकत्याच झालेल्या दापोलीत झालेल्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी व मंत्र्यांनी दळवींना टीकेचे लक्ष बनविल्याने आता शिवसैनिकांमधील सभ्रम बहुतांशी दूर झाल्याचे चित्र असून केवळ ‘मातोश्री’कडून दळवींना कोणता आदेश मिळतो व तो दळवी शिरसावंद्य मानून काम करणार का, या प्रश्‍नाच्या उत्तराकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

‘मातोश्री’चा आदेश भगव्याचे काम करा असा असल्याने काम कोणाचे करायचे हा प्रश्‍नच शिवसैनिकांच्या द‍ृष्टीने निर्धार मेळाव्यानंतर निकाली निघाला आहे. त्यामुळे दळवींवर दापोली विधानसभा  क्षेत्रात कदम वरचढ  अशीच स्थिती सध्या पहायला मिळत आहे. ‘मातोश्री’वर देखील दळवींपेक्षा कदम गटाचे वजन अधिक असल्याची चर्चा दापोली विधानसभा क्षेत्रात निर्धार मेळाव्यानंतर सुरू आहे.

 

Tags : Khed, Khed news, Ramdas Kadam, Dapoli, assembly constituency,