Sun, Jun 16, 2019 03:13होमपेज › Konkan › चार वर्षांपूर्वीच्या खुनाला फुटली वाचा; एकाला अटक

चार वर्षांपूर्वीच्या खुनाला फुटली वाचा; एकाला अटक

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 1:24AMराजापूर : प्रतिनिधी

चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या गोठणे-दोनिवडेमधील प्रमोद आत्माराम दळवी याचा खून करून त्याचा मृतदेह पुरण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहेे. हाती आलेल्या धागेदोर्‍यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील आरोपीच्या पत्नीचा फोटो प्रमोदच्या मोबाईलमध्ये असल्याच्या संशयावरून हा खून झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

याप्रकरणी  संदेश आत्माराम  धुरी व विकास  देऊ धुरी  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी संदेशला अटक झाली असून, पोलिस विकासचा  शोध घेत आहेत. मूळ गोठणे-दोनिवडे गावातील प्रमोद दळवी याचा कोंड्ये येथे वेल्डिंगचा कारखाना होता. तो कोंड्ये येथे आपल्या आत्याकडे राहत होता. अधूनमधून प्रमोद  हा मूळ गावाला गोठणे-दोनिवडेला जायचा. प्रमोदच्या कारखान्यात  प्रिंदावण मानवाडीतील संदेश धुरी कामाला होता. त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता.  मात्र, एकेदिवशी आपल्या पत्नीचा फोटो प्रमोदच्या मोबाईलमध्ये असल्याच्या संशयावरून संदेशने तुझ्या मोबाईलमध्ये माझ्या पत्नीचा फोटो आहे, तो मला दाखव, अशी मागणी प्रमोदकडे वारंवार केली होती; पण प्रमोदने आपल्याकडे तुझ्या पत्नीचा फोटो नसल्याचे सांगितले होते.

मात्र, त्याने आपला मोबाईल काही संदेशला पाहण्यासाठी दिला नव्हता. यातून संदेशच्या मनातील संशय अधिकच बळावला होता. त्यामुळे संदेशने प्रमोदला कायमचीच अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला.  या संशयातून दि. 30 मार्च 2014 रोजी जंगलात शिकारीला जाण्याचा बहाणा करून संदेशने त्याचा मित्र विकास धुरी याच्यासह प्रमोदला जंगलात नेले.

 मृतदेहाची जंगलात विल्हेवाट

 जंगलात शिकारीसाठी फिरताना त्याने  पुन्हा प्रमोदकडे मोबाईलमधील माझ्या पत्नीचा फोटो दाखव, असे सांगितले. मात्र, तेथेही त्याने तो न दिल्याने खवळलेल्या संदेशने बाजुला पडलेला चिरा प्रमोदच्या डोक्यात घातला. दरम्यान, हा घाव वर्मी बसल्याने प्रमोद दळवी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संदेश व त्याचा मित्र विकास धुरी यांनी संदेशच्या अंगावरील कपडे काढून मृतदेह तेथेच जंगलात पुरुन त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर हे दोघेही प्रमोदच्या शिकारीला नेलेल्या दुचाकीने कारखान्याजवळ आले. तेथे त्यांनी दुचाकी उभी करुन हे दोघेही आपपल्या घरी निघून गेले.

दरम्यान, प्रमोदची सर्वत्र शोधाशोध झाली पण त्याचा पत्ता काही न लागल्याने त्याचे वडील आत्माराम दळवी यांनी दि. 31 मार्च 2014 रोजी राजापूर पोलिस ठाण्यात प्रमोद बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. त्यावेळी संदेश याचीही चौकशी झाली होती.  यावेळी आपल्याला घरी सोडून रत्नागिरीला कामानिमित्त जात असल्याचे सांगून प्रमोद गेला होता, अशी माहिती त्याने दिली होती. चार वर्षे झाली पण बेपता प्रमोदचा तपास लागला नव्हता. राजापुर  पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील यांच्याकडे तपास दिला होता. त्यांनी या तपासाला गती देत मिळालेल्या धोगेदार्‍यांच्या आधारे या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संदेश धुरीला प्रथम ताब्यात घेतले. प्रमोदचा कारखाना बंद झाल्यानंतर तो मोलमजुरी करीत होता. त्याच्याकडे चौकशी केली तर चार वर्षांपूर्वी कोणत्या कारणावरुन गुन्हा केला यासह प्रमोदचा खून केल्यावर त्याचा मृतदेह जेथे पुरला ती जागाही त्याने पोलिसांना दाखविली. त्याजागी  पोलिसांनी  उत्खनन केल्यावर एक हाड सापडले आहे. आता ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  संदेशने खून केल्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही पोलिस कसुन शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रायसिंग पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.