Fri, Jul 19, 2019 18:48होमपेज › Konkan › ‘नाणार’ला सेनेचा विरोध तरीही....!

‘नाणार’ला सेनेचा विरोध तरीही....!

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 9:19PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

स्थानिक जनतेचा कडवा विरोध लक्षात घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचाही स्थानिक जनतेसोबत विरोध असेल असे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी या प्रकल्पाच्या विरोधी भूमिका घेत रस्त्यावर उतरले. मात्र, तरीदेखील या रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेना विरोधी भूमिका घेत प्रकल्प रद्द न झाल्यास ‘मातोश्री’समोर उपोषण करण्याचे जाहीर केल्याने स्थानिक जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नुकत्याच मुंबई आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात शिवसेना खा.विनायक राऊत, आ.राजन साळवी, राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर आदी 
प्रमुख पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक या रिफायनरी विरोधी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी टीका केली. यामुळे उपस्थित शिवसैनिकां मधून संताप व्यक्त केला जात आहे.

नाणारमधील प्रकल्पग्रस्त तसेच प्रकल्प विरोधकांनी राजकीय पक्षांना बाजूला ठेवून हे आंदोलन आपल्या शिरावर घेतले होते. अशा परिस्थतीतही आ.राजन साळवींनी स्वत:हून या आंदोलनात सहभागी होत अधिसुचनेची होळी करीत आपला विरोध स्पष्ट केला होता. मात्र, त्यांनतर राजापूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चात राजकीय लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊ नये, असे संघर्ष समितीने सांगितल्याने या मोर्चात आ.राजन साळवी सहभागी झाले नव्हते. मात्र, रिफायनरी विरोधातील जनमानसातील धार तीव्र होऊ लागल्याने आ.राजन साळवींनी संघर्ष समितीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घालून देण्यासाठी पुढाकार घेतला होता.

शुक्रवारच्या मुंबई येथील धरणे आंदोलनात मुंबईतील राजापूरवासीय, प्रकल्पग्रस्त व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी दादर येथील सभागृहात सभेचे आयोजन केले होते. एकीकडे राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेला आंदोलनापासून दूर ठेवणे व आंदोलनात सहभागी झाल्यास यापूर्वी कोठे होता? असा प्रश्‍न उपस्थित करणे म्हणजे दुटप्पीपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त केल्या जात आहेत.  प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नाराज झालेले लोकप्रतिनिधी व शिवसैनिक भविष्यात रिफायनरीविरोधी आंदोलन अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने शिवसेना आपला पवित्रा बदलणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. दरम्यान या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी खा.विनायक राऊत व आ.राजन साळवी लवकरच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात लढा अधिक तीव्र करणार असून यापुढे देखील या प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोधच राहणार असल्याची माहिती आ.राजन साळवी यांनी दिली आहे.