Sat, Nov 17, 2018 22:52होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात आ.  राजन साळवींची लक्षवेधी

‘नाणार’विरोधात आ.  राजन साळवींची लक्षवेधी

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:56PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रखर विरोध असून तो प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी आमदार राजन साळवी यांनी नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लक्षवेधीसह औचित्याचा मुद्दा व सभागृहात अर्धा तास चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यामध्ये चर्चेसाठी अर्धा तास चर्चा क्र. 224, लक्षवेधी क्रमांक 1774 व औचित्याचा मुद्दा दाखल केला आहे. नाणार - सागवे परिसरातील बाभूळवाडी परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्थापित असून त्यामुळे चौदा गावे बाधित होणार आहेत. त्यासाठी 5461 .472 हेक्टर आर क्षेत्र बाधित होणार आहे.

एकूण 3636 लोकसंख्या व  2068 कुटुंबे बाधित होणार असून या प्रकल्पामुळे या परिसरातील हापूस आंबा, मच्छीमारी, भातशेती यांचे नुकसान होणार असून स्थानिक जनतेचा त्याला कडाडून विरोध आहे. यापूर्वी सुनावणीच्या वेळी जनतेचा विरोध दिसून आला आहे. शिवाय प्रकल्प परिसरातील ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प हद्दपार व्हावा म्हणुन  ग्रामसभेचे ठराव केले आहेत, असा स्पष्ट उल्लेख आमदार राजन साळवी यांनी दाखल केलेल्या त्या मागणीमध्ये केला आहे. 

हा प्रकल्प रद्द व्हावा, अशी मागणी त्यांनी दाखल केली आहे. नागपूर येथे सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रिफायनरी प्रकल्पाविरोधात आमदार राजन साळवी यांनी ही मागणी दाखल केली आहे. आमदार साळवींच्या या मागणीला  आमदार सदानंद चव्हाण व आमदार वैभव नाईक यांनी पाठिंबा दिला आहे.