Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Konkan › निसर्गरम्य जुवे जैतापूर गाव विकासाच्या प्रतिक्षेत

निसर्गरम्य जुवे जैतापूर गाव विकासाच्या प्रतिक्षेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

सर्व बाजूंनी जैतापूर खाडीतील  अथांग पाण्याचा  पडलेला  वेढा... त्यामध्ये उंचावर वसलेले  निसर्गरम्य गाव ... गावाकडे जाण्यासाठी पक्क्या स्वरुपात नसलेला  रस्ता... परिणामी होडीचा घ्यावा लागत असलेला आधार ... अशी विदारक परिस्थिती असतानादेखील शासनाकडून झालेले दुर्लक्ष अशा अस्मानी  व सुलतानी संकटांचा सामना करणार्‍या तालुक्यातील जुवे - जैतापूर हे छोटेसे गाव आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. 

सध्या केवळ 78 एवढी लोकसंख्या आहे.  येथील ग्रामपांचायतीचे 7 सदस्य संख्या असून केवळ 71 मतदार त्यांचे भवितव्य ठरवितात. बहुदा राज्यात सर्वात कमी मतदारसंख्या असणारे जुवे हे एकमेव गाव असावे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या गावावर आलेली ही अवकळा शासकीय पातळीवरुन दूर होईल का? येथील जनतेच्या दुर्दैवाचे दशावतार केव्हा संपणार? हाच खरा प्रश्‍न आहे.
राजापूर तालुक्यातील पश्‍चिम किनारपट्टीवरील एका छोट्याशा बेटावर हे गाव वसलेले आहे. चारही बाजूंनी जैतापूर खाडीचा विळखा असल्याने व कायमस्वरूपी अथांग पाणी असल्याने  या बेटावर जायचे असल्यास होड्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. 

यापूर्वी जैतापूर गावचाच एक भूभाग अशी जुवे - जैतापूरची अनेक वर्षांची ओळख होती.  सन  1969 साली जैतापूरची विभागणी होऊन  जुवे - जैतापूर या ग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यानुसार या गावचे क्षेत्रफळ 45 हेक्टर आहे. तेव्हापासून या गावचा कारभार सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांत 4 सरपंच या गावाने पाहिले त्यामध्ये लक्ष्मण सोनू फडके (20 वर्षे), अनंत सरपोळे (5 वर्षे), विश्‍वनाथ कांबळे (10  वर्षे ) व दर्शना सरपोळे (10 वर्षे ) असा त्यांचा कालावधी राहिला आहे. 

गावात ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकाम सन 2011 साली झाले. गेल्या अनेक वर्षांत या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आली आहे.  यावेळीही बिनविरोध होईल, असा विश्‍वास मावळत्या सरपंच दर्शना सरपोळे यांनी व्यक्त केला. गावच्या निवडणुका बिनविरोध होत असल्याने निवडणूक विभागाच्या यंत्रणेला  खाडी पार करुन जायची वेळ येत नाही. मात्र, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत मतदानासाठी जुव्यातील लोकांना दळे येथील शाळेत जावे लागते.

तो प्रवास जुवे ते जैतापूर आगरवाडी असा होडीने व पुढे पायी करावा लागतो. सध्या या गावात सुमारे 150 च्या आसपास घरे असून त्यातील 100 घरे बंद असतात. कारण तेथील रहिवाशी आपापल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईसह अन्यत्र असून ते होळी,गणपती या सणांसह मे महिन्यात गावी येतात. त्यामुळे त्यांची घरे बंद असतात. जी मंडळी गावी रहातात त्यांचीच घरे सदैव उघडी असतात, अशी   50  घरे  आहेत.

या गावात चौथीपर्यंत प्राथमिक शाळा असून सध्या दुसरीच्या वर्गात केवळ 2 विद्यार्थी आहेत. उर्वरित वर्गात एकही विद्यार्थी नाही. त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 1 शिक्षक नियुक्त करण्यात आलेला आहे. गावात एक अंगणवाडी असून त्यामध्ये एकही मुल नाही. गावात रोजगाराचे एकही साधन नाही. समुद्रातील मच्छी विकून येथील लोक आपली उपजीविका करतात. या व्यतिरिक्त गावातील सुमारे 10 ते 12 विद्यार्थी जैतापूरला शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. त्यांना होडीद्वारे हा प्रवास करावा लागतो.

गावात रेशनिंगसह कुठलेच दुकान नाही. अन्नधान्यासहित भाजीपाला, औषधे, डॉक्टर, माध्यमिक  शिक्षण अशा दैनंदिन गरजांसाठी होडीने जैतापूर किंवा धाऊलवल्लीकडे यावे लागते. जैतापुरात रेशनिंगसाठी जावे लागते.त्यासाठी रात्री - अपरात्री होडीची सेवा सुरु असते. रात्री कुणी आजारी पडले तर त्याला होडीतून पलीकडे उपचारासाठी नेताना खूप त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर तो त्रास जास्तच असतो. या व्यतिरिक्त कुणाला घराचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी लागणारे चिरे, वाळू, सिमेंट, लादी  व अन्य साहित्य याची वाहतूक होडीतूनच करावी लागते. यापूर्वी शासनाच्या खारलँड बंधार्‍याच्या माध्यमातून हे बेट देवाचेगोठणेला जोडण्यात आले होते. त्यावेळी काही वाहने गावात यायची एक चांगली सुविधा निर्माण झाली होती. मात्र नंतर तो मार्ग बंद झाला. येथील जनतेच्या नशीबी पुन्हा होडीचाच प्रवास सुरु झाला. जुवे गावाला रस्ता व्हावा म्हणून ग्रामस्थ अनेक शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. पण त्या प्रयत्नांना यश अद्याप तरी आलेले नाही. त्या परिसरात कांदळवने नियमानुसार ती तोडता येत नाहीत. त्यामुळे या कात्रीत तो रस्ता अडकून पडला आहे.