Thu, Nov 15, 2018 06:19होमपेज › Konkan › रिफायनरी’विरोधी लढ्याला  बळ देण्यासाठी 7 रोजी मुंबईत सभा

रिफायनरी’विरोधी लढ्याला  बळ देण्यासाठी 7 रोजी मुंबईत सभा

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:57PM

बुकमार्क करा
‘राजापूर : प्रतिनिधी

शासनाने जबरदस्तीने कोकणवासीयांच्या माथी लादलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध सुरू असलेला संघर्ष आणखी व्यापक होत असून शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात उभी ठाकली आहे. त्यातूनच  दि. 7 जानेवारी रोजी मुंबईच्या शिरोडकर हॉलमध्ये सायंकाळी 4.30 वा.  मुंबईवासीय प्रकल्प विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी उपस्थित राहणार आहेत. खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पविरोधी लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी व्यक्त केला.

मागील काही महिने रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार रणकंदन पहावयास मिळाले. या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रखर विरोध  असल्याने अनेक आंदोलने झाली. प्रकल्पाला आवश्यक जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांना स्थानिकांच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता, तर या प्रकल्पविरोधाचे पडसाद मुंबईपासून थेट नागपूर अधिवेशनातही दिसून आले होते. प्रकल्प विरोधकांना भक्कम बळ देताना शिवसेनेसह कोकणच्या अन्य पक्षीय आमदारांनी विधानभनाच्या पायर्‍यांवर जोरदार आंदोलन करत प्रकल्प विरोधाची धार वाढविली होती. यामध्ये आ. राजन साळवी यांनी तर थेट विधिमंडळात लक्षवेधीसह प्रश्‍न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

राजापूरच्या दौर्‍यावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिवसेना जनभावनांचा आदर करील, असे स्पष्ट करीत  रिफायनरीला असलेला विरोध दाखवून दिला होता. तरीही शासन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याने विरोधातील आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर 7 रोजी जानेवारीला मुंबईतील रिफायनरीविरोधात मुंबईतील मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह सेनेचे स्थानिक तसेच मुंबई पातळीवरील पदाधिकारी, शेतकरी, मच्छीमार आदी उपस्थित असल्याचे सभेचे आयोजक व  शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी सांगितले.