होमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल

राजापूर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 8:38PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना, भाजप, काँग्रेस यांच्या उमेदवारांसह एकूण आठ अर्ज सादर केले. त्यामध्ये एका डमी उमेदवाराचादेखील समावेश  आहे. तर  भाजपमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षाच्या माजी नगरसेविका शीतल पटेल यांनी बंडखोरी करीत आपला अर्ज सादर करुन पक्षाची डोकेदुखी वाढविली आहे.

पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला राजापूरच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी 19 जूनपासून अर्ज सादर करायला सुरूवात झाली होती. 25 जून ही अखेरची तारीख होती. पण एकाही उमेदवाराने आपला अर्ज सादर केला नव्हता. त्यामुळे अखेरच्या दिवशी कोण - कोण उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. 

सोमवारी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून अभय मेळेकर, काँग्रेस आघाडीकडून विद्यमान उपनगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी चार प्रतींत आपले अर्ज सादर केले. काँग्रेस आघाडीकडून माजी नगराध्यक्षा स्नेहा कुवेस्कर यांनी डमी अर्ज सादर केला आहे. या निवडणुकीत स्वतंत्र लढणार्‍या  भाजपकडून विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी आपला अर्ज सादर केला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या माजी नगरसेविका शीतल पटेल यांनी बंडाचे निशाण फडकावत आपला अर्ज भरल्याने भाजपपुढील अडचणीत वाढ झाली आहे. अखेरच्या दिवशी एकूण 5 उमेदवारांनी 8 अर्ज भरले आहेत.

शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.  उमेदवार अभय मेळेकर यांच्या समवेत आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, काँग्रेस आघाडीकडून उमेदवार जमीर खलिफेंसमवेत आ. हुस्नबानु खलिफे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार, आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. भाजप उमेदवारासमवेत तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुटकर, महादेव गोठणकर, स्वप्नील गोठणकर, सुरेश गुरव यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते.आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार त्यावर राजापुरातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र दिसणार आहे .