Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Konkan › राजापूर, लांजात कडकडीत बंद

राजापूर, लांजात कडकडीत बंद

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:03PMराजापूर : प्रतिनिधी

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला राजापूर व लांजा तालुक्यांत  शंभर टक्के प्रतिसाद लाभला. राजापूर शहरासह तालुक्यातील दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी उत्तर रत्नागिरीत बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मराठा समाज बांधवांनी शुक्रवारी राजापूर येथील जवाहर चौक येथे एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तसेच जवाहर चौक, बाजारपेठ, शिवाजीपथ अशी फेरी काढण्यात आली. यावेळी आ. राजन साळवी, आ. हुस्नबानू खलिफे, माजी आ. गणपत कदम, सभापती अभिजीत तेली, नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे, मराठा समाजाचे शहाजीराव खानविलकर, ‘स्वाभिमान’चे तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे, सेनेचे संपर्क प्रमुख दिनेश जैतापकर यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राजापूर तालुक्यातील मराठा बांधवांनी तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी राजापूर शहरासह तालुक्यातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्याचप्रमाणे रिक्षा व्यवसायिकांनीही पाठिंबा देत रिक्षा व्यवसाय बंद ठेवला होता. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. राजापूरात एसटी वाहतूकही बंद होती. त्यामुळे तालुकावासीयांचे हाल झाले. एसटी फेर्‍या बंद असल्याने शाळा, महाविद्यालयांत येणारे विद्यार्थी, नोकरदार यांची मोठी गैरसोय झाली.

लांजा तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर  कडकडीत बंद  पाळण्यात आला.  सकाळी 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी दुकाने चालू ठेवण्यात आली होती. त्यानंतर मात्र दिवसभर ही दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात हा बंद शांततेत यशस्वी झाल्याचे चित्र होते. दुपारनंतर अनेक एसटी बसच्या फेर्‍या बंद करण्यात ठेवण्यात आल्या होत्या. 
लांजा तालुक्यात अगदी ग्रामीण भागासह शहरातही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. राजापूरात एसटी वाहतूकही बंद होती. एसटी फेर्‍या बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार यांची मोठी गैरसोय झाली.