Fri, Jul 03, 2020 14:51होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधात सेना स्वतंत्र लढा उभारणार?

रिफायनरी विरोधात सेना स्वतंत्र लढा उभारणार?

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:07AM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

सुरवातीपासून रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध संघर्षाचे रान उठवूनही  शिवसेनेवर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीकडून टीकास्त्र कायम होत  राहिल्याने शिवसेनेत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आता शिवसेना जनभावना लक्षात घेऊन रिफायनरी विरोधात आपला स्वतंत्र लढा व्यापक स्वरुपात उभारेल, अशी  शक्यता आहे. त्यासाठी गुरुवार 14 डिसेंबरला सागवे गावामध्ये  शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

अडीच लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार -सागवे परिसरात मंजूर झाला आणि स्थानिक जनतेने तो प्रकल्प पर्यावरणाला धोका निर्माण करील या भीतीपोटी  त्याविरोधात संघर्ष सुरु केला. हळूहळू रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध जनमत तयार होत असतानाच शिवसेनेने या प्रश्‍नी लक्ष घातले. जर या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेना 
जनतेसमवेत राहिल, अशी रोखठोक भूमिका जाहीर  केली होती. गत जून 

महिन्यात प्रकल्प परिसरात रिफायनरीच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षासमवेत शिवसेनेचे पदाधिकारी त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी उपस्थित असणारे 
आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध टीका करताना जनभावनेचा आदर राखून  सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली होती. रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध  मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या धरणे आंदोलनात शिवसेनेच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रकल्पविरोधी समितीकडून त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते आंदोलन संपल्यावर शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधण्यात आला. प्रकल्प रद्द न झाल्यास थेट 

‘मातोश्री’समोर आंदोलन करण्याची भाषा झाल्याने शिवसेनेत संताप पसरला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत गुरुवार 14 डिसेंबरला सागवेमधील नाकटेबाग येथे महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. त्याला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेना आपले स्वतंत्र आंदोलन देखील उभारण्याबाबत विचार करणार असल्याचे 
समजते. त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.