Sun, Apr 21, 2019 13:55होमपेज › Konkan › ठेकेदाराच्या कार्यालयावर हातिवलेवासीयांची धडक

ठेकेदाराच्या कार्यालयावर हातिवलेवासीयांची धडक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील हातिवले येथे चौपदरीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यात येत होता. त्यामुळे तेथील बोअरवेल व विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली होती. याविरोधात माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी हातिवले येथील ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात धडक दिली आणि पाणी उपसा करणे तत्काळ बंद करण्यास सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले ते खारेपाटण दरम्यानच्या कामाचा ठेका एका कंपनीला देण्यात आला आहे. या ठेकेदार कंपनीमार्फत सद्य:स्थितीत सपाटीकरणाचे काम सुरू आहे.

या कंपनीने हातिवले येथील शिक्षक कॉलनी परिसरात जागा भाड्याने घेऊन आपले कार्यालय थाटले आहे. या जागेतच कंपनीने जवळपास 6 बोअरवेल खोदल्या आहेत. या बोअरवेलमधून पाणी टँकरमध्ये भरून सपाटीकरण करण्यात येणार्‍या रस्त्यावर मारण्यात येत आहे. बोअरवेलमधून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी उपसण्यात येत असल्याने शिक्षक कॉलनी परिसरात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

बोअर मारताना कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. शिवाय नियमांचे उल्‍लंघन करून प्रमाणापेक्षा खोलीच्या बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब त्यांनी निदर्शनात आणून दिली. रस्ता कामासाठी अन्य ठिकाणाहून पाण्याची व्यवस्था करा, अशा सूचना कदम यांनी संबंधित अधिकार्‍यांना  दिल्या.  

चौपदरीकरणासाठी सर्वेक्षणाअंती निश्‍चित केलेल्या जागेपेक्षा जास्त जागा घेण्यात येत असल्याचेही यावेळी उपस्थितांनी कंपनीच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी येथील प्रोजेक्ट मॅनेजर श्रवणकुमार यांनी सर्व मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचवणार असल्याचे सांगितले. यावेळी जगदीश पवार, शांताराम तळवडेकर, सुयोग कविस्कर, किरण कोळेकर, एजाज काझी, नाना गोटम, अजित घाणेकर, सुबोध कोळेकर आदी उपस्थित होते.  
 


  •