Tue, May 21, 2019 04:31होमपेज › Konkan › कोकण मराठी माणसाच्या हातून घालवू नका : राज ठाकरे

कोकण मराठी माणसाच्या हातून घालवू नका : राज ठाकरे

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:21PMखेड : प्रतिनिधी

कोकण मराठी माणसाच्या हातून घालवू नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले. शनिवार दि.26 रोजी शहरातील अनिकेत शॉपींग सेंटर सभागृहात मनसेतर्फे आयोजित संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात कोकणविषयी स्तुती केली.

कोकण दौर्‍यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवार दि.26 रोजी खेडमध्ये आले. त्यांचे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोटे येथे स्वागत केले. लोटे येथून असगणी पर्यंत दुचाकी फेरी काढण्यात आली. असगणी येथे राज ठाकरे यांच्याहस्ते जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला राज ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. भरणेनाका ते खेड शहर दुचाकी फेरी काढून शहरातील विझणध भागातून ही रॅली काढण्यात आली. 

या नंतर संवाद कार्यक्रमात ते म्हणाले, कोकणच्या मातीचे महत्व येथील रहिवाशांनी समजून घेणे गरजेचे आहे. येथील लोक जगत आहेत मात्र ते कशासाठी जगतायत हे कळत नाहीय. कोकणच्या मातीत काय नाही हे येथील जनतेने सांगावे. या भागात सगळ्याच बाजूने श्रीमंती दडली आहे. बुद्धीमत्ता, विवीध क्षेत्रातील कौशल्य यामुळे प्रत्येक क्षेत्रात कोकण अग्रेसर आहे. देशाला चार भारतरत्न देणारी दापोली सारखी भूमी या कोकणात आहे. क्रिकेटमध्ये जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवलेले खेळाडू, संगीतात लता मंगेशकर यांच्यासह अनेक दिग्गज कलावंत कोकण व परिसरातील भागातून लाभले आहेत. परमेश्‍वराने कोकणला भरभरून दिलेले असताना कोकणी माणूस निरूत्साही का, असा सवाल त्यांनी केला.

कोकणातील लोक जमिनी का विकतात हे जाणून घेत असताना काही जणांनी सांगितले की, येथील लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई, पुणे येथे आहेत. त्यामुळे गावी जमिनीकडे लक्ष देता येत नसल्याने त्या विकण्यात येत आहेत. मात्र, माझी कळकळीची विनंती आहे की जमिनी विकल्या तर कोकणी माणसाचे अस्तित्व संपेल. नाणार प्रकल्पाच्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या हे उघड झाले आहे. येथील माणसाच्या पूर्वीच या अमराठी माणसांना येथे प्रकल्प येणार आहे हे माहीत होते यातून कोकण कोकणी माणसाच्या हातून निसटत असल्याचेच स्पष्ट होते. आपण 2013 मध्ये खेडमध्ये आलो होतो तेव्हा देखील सांगितले होते आपल्या जमिनी विकू नका. कोकणावर जागता पहारा द्या, कारण एकदा कोकण हातून निसटले तर पुन्हा परत येणार नाही. परप्रांतिय येथे येतात मंदिरात ट्रस्टमध्ये घुसतात हळूहळू येथील जमिनी, व्यवसाय, शिक्षणसंस्था सर्व ताब्यात घेतील. कोकणी तरूणांनी आता घट्ट पाय रोवून उभे राहणे गरजेचे आहे. व्यवसाय करा, इंटरनेटवर व्यवसायाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे ती मिळवा पण कोकण मराठी माणसाच्या हातून घालवू नका एवढच सांगण्यासाठी मी येथे आलोय, असे ते म्हणाले. यावेळी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई, माजी आमदार शिरीष सावंत, खानविलकर, कोकण संघटक व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.