Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’बाबत राज ठाकरे १३ रोजी भूमिका जाहीर करणार

‘रिफायनरी’बाबत राज ठाकरे १३ रोजी भूमिका जाहीर करणार

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:29PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

शासनाने कोकणवासीयांवर लादलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली असताना त्या पाश्‍वर्र्भूमीवर ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवार दि. 13 रोजी राजापूर दौर्‍यावर येत असून त्यादिवशी सकाळी 11 वा. ते सागवे येथे प्रकल्पविरोधकांची भेट घेणार आहेत. या प्रकल्पाबाबत ‘मनसे’ची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर झालेली नसल्याने राज ठाकरे कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तालुक्यातील सागवे-नाणार परिसरातील 14 गावांमध्ये शासनाने रिफायनरी प्रकल्प मंजूर केला आणि त्यावरून विरोधाला सुरुवात झाली. यामध्ये सत्ताधारी भाजप वगळता उर्वरित राजकीय पक्षांनी प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला होता. काही दिवसांपूर्वी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून त्या पक्षाचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी प्रकल्पग्रस्त परिसराचा दौरा करताना सागवे व कुंभवडे येथे सभा घेऊन  येथील जनतेचा या प्रकल्पाला नक्की विरोध का आहे, हे जाणून घेतले होते. त्याचा अहवाल लवकरच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. याच संदर्भात सोमवारी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

यावेळी ‘मनसे’ अध्यक्षांनी सर्व माहिती समजून घेतली व दि. 13 जानेवारीला  रिफायनरी प्रकल्प परिसराचा दौरा करण्याचे निश्‍चित केले आहे. रिफायनरीवरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी जनतेच्या समवेत राहताना प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्या आहेत.