Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Konkan › आंबोलीतील वर्षा पर्यटन म्हणजे स्वर्गीय अनुभूतीच!

आंबोलीतील वर्षा पर्यटन म्हणजे स्वर्गीय अनुभूतीच!

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 10:31PMआंबोली : निर्णय राऊत  

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे आंबोलीतील पावसाळी पर्यटन म्हणजे साक्षात स्वर्गीय अनुभूतीच!वर्षा पर्यटनात येथील नयनरम्य निसर्गाचा आस्वाद, पावसात धबधब्यावर भिजण्याचा तसेच मौजमजा करण्यासाठी लाखो पर्यटक आतापासूनच आंबोलीत दाखल होवू लागले आहेत. पावसाळ्यात होणार्‍या रेकॉर्ड ब्रेक गर्दीला आवरण्यासाठी तसेच विपरीत घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या तीन्ही ऋतूत आंबोली पर्यटकांनी बहरलेली असते.मात्र सर्वात निसर्गसौंदर्य असलेल्या नयनरम्य आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेणे सर्वांसाठीच स्वर्गीय अविस्मर्णीय ठेवाच ठरतोे.घाटातील मुख्य धबधबा सुरू झाल्यावर येथील वर्षा पर्यटन उत्साहाने सुरू होणार असून पहिल्याच पावसात हा धबधबा प्रवाहीतही झाला आहे.पश्‍चिम महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोव्याला एकत्रित जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. वर्षा पर्यटनावेळी पर्यटकांना मुसळधार पावसात घनदाट धुक्यात सतत आव्हान देणारे एकमेव ठिकाण म्हणून आंबोली पर्यटन स्थळाची ओळख आहे.पावसाळ्यात आंबोली घाटातून प्रवास करताना गर्द हिरवागार शालू पांघरलेल्या निसर्गाचा आस्वाद वर्षा पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटक दरवर्षी घेतात.निसर्ग पाहत घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक अविस्मरणीय ठेवाच ठरतो. पावसाळ्यात तसेच जोडून येणार्‍या सुट्ट्यांच्या दिवशी येथे पर्यटकांचा हजारोंच्या संख्येने ओघ सुरू असतो.आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या,पावसाळ्याच्या दिवसात तर दाट धुक्यामुळे हा परिसर पर्यटकांना मोहून टाकतो. 

आंबोलीमध्ये अजूनही संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात. घाटमार्गातील मुख्य धबधबा, महादेवगड पॉईंट्स, सनसेंट पॉईंट्स, शिरगावकर पॉईंट्स, हिरण्यकेशी नदी उगमस्थान, राघवेश्‍वर स्वयंभू गणेश मंदिर-मठ, नांगरतास धबधबा, कावळेशेत पॉईंट्स, सडे-पठार तसेच अन्य पॉईंट्स प्रवाशांना आकर्षित करत असतात.आंबोलीपासून जवळच असलेल्या निसर्गरम्य अशा चौकुळ जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे असे वन्य प्राणी वास्तव्य करुन आहेत. हे सर्व जंगल सफारीवेळी सहज नजरेस पडतात. अशा या निसर्गाची अमूल्य देणगी लाभलेल्या आंबोलीतील यंदाच्या वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले असून यावर्षीही आंबोलीत विक्रमी गर्दी होईल, असा अंदाज आहे.