Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Konkan › जिल्ह्यात मुसळधार 

जिल्ह्यात मुसळधार 

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 11:00PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला असून, भात पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वापरण्यात आलेली माती रस्त्यावर आली असून हा चिखल अपघातास कारणीभूत ठरत आहे. गत चोवीस तासांत जिल्ह्यात 11.7 मि.मी. सरासरीने 88.6 मि.मी. पाऊस पडला आहे.

साधारणतः जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. तसेच अधून-मधून जिल्ह्यात तुरळक आणि मुसळधार पाऊस पडत आहे. शिवाय हवामान खातेही गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्‍त करत आहे. दुपारी अचानक ढगाळ वातावरण झाले आणि त्यानंतर क्षणातच गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात गत चोवीस तासांत 11.7 च्या सरासरीने 88.6 मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग- 41 (42), सावंतवाडी- 10 (15), वेंगुर्ला- 8.6 (45.6), कुडाळ- 2 (33), मालवण- 18 (27), कणकवली- 6 (6), देवगड- 1 (58), वैभववाडी- 2 (24) मि.मी. पाऊस पडला आहे.

दोडामार्गात मुसळधार 

दोडामार्ग तालुक्यात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना देखील प्रारंभ झाला आहे. गेले दोन दिवस पाऊस कोसळत असल्याने उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा गारवा मिळाला आहे.  दोडामार्ग शहर, साटेली-भेडशी बाजारपेठेत बांधकाम विभागाने गटारे खुली केली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. आयी मार्गावर पाणी संपूर्ण रस्त्यावर आल्याने रस्ता दिसेनासा झाला होता.

भात पेरणीला सुरुवात

जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली असली तरी येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतकर्‍यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. तसेच भात पेरणीही जिल्ह्यात सुरु झाली आहे.

5 ते 7 रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

5 ते 7 जून या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे त्यानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी अशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.महामार्गावरील चिखल ठरतोय अपघातास कारणीभूतमहामार्ग चौपदरीकरण कामासाठी भराव टाकण्यासाठी वापरण्यात आलेली माती पावसामुळे रस्त्यावर वाहून आली आहे. या मातीने रस्त्यावर चिखल झाला असून हा चिखल अपघातास करणीभूर ठरत आहे.