Sun, Nov 17, 2019 07:32होमपेज › Konkan › साडेचार लाखांची हानी : 48 तासांत वादळी पावसाचा इशारा

जिल्ह्यात ‘पूर्वमोसमी’ मुसळधार

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 11:09PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी पूर्वमोसमी पावसाने रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात दमदार हजेरी लावली. सायंकाळी चारनंतर आलेल्या  पावसाला जोरदार वार्‍याची साथ लाभल्याने अनेक भागांत पडझडीही झाल्या. सोमवारी जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस 287 मि.मी.एवढा नोंदवला गेला. तर नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात या पावसामुळे सुमारे साडेचार लाखांची हानी झाली. आगामी दोन दिवसांत मान्सून सक्रिय होताना वादळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

जिल्ह्यात अद्याप मोसमी पावसाची प्रतीक्षा असताना कुलाबा वेधशाळेने मोसमी पवसाचे आगमन दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, वेधशाळेच्या पूर्वअनुमानावरून  गेले दोन दिवस पूर्वमोसमी पावसाचा तडाखा  बसला. रविवारीही पावसामुळे जिल्ह्यात सुमारे 7 लाखांची हानी झाली. तर सोमवारी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडवून दिली. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या प्राथमिक अहवालानुसार मंडणगड तालक्यात पिंपळवाडी येथील रस्ता आणि संरक्षण भिंत खचली. दापोली तालुक्यात खोपी येथे राजाराम बर्गे यांच्या गाईचा पावसामुळे  मृत्यू झाला. खेड तालुक्यात 
तुळशी खुर्द येथील दत्ताराम उतेकर यांच्या  घराचे पावसामुळे अंशता 75 हजारांचे नुकसान झाले.  संगमेश्‍वर तालुक्यात आंबववाडी येथे यशवंत केपडे यांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याचे सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले. तसेच फणसवणे येथील 2 घरांवर झाड पडून घराचे अंशत: नुकसान झालेे.

रविवारी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सुमारे सात लाखांची हानी झाली. यामध्ये सर्वाधिक चिपळूण आणि राजापूर तालुक्यांना बसला होता. रत्नागिरीतही जोरदार पावसाने ग्रामीण भागात तारांबळ उडवली होती.सोमवारी झालेल्या पावसाने बहुतांश भागात जोरदार मुसंडी मारली. सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने 287 मि.मी.ची मजल मारली होती. सर्वाधिक पावसाचा तडाखा  मंडणगड तालुक्याला बसला तर दापोली आणि चिपळूण तालुक्यात कमी पाऊस झाला.