होमपेज › Konkan › गणेशोत्सवासाठी ११ मेपासून रेल्वे आरक्षण

गणेशोत्सवासाठी ११ मेपासून रेल्वे आरक्षण

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:39PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील चाकरमान्यांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षणाची तयारी सुरू झाली आहे. यंदा 13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने रेल्वेच्या नियमानुसार 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण मे महिन्यात होणार आहे. शुक्रवार, दि. 11 मेपासून आरक्षण सुरु होणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे मुंबईसह देश-विदेशांतील लाखो गणेशभक्‍त आपल्या गावाकडे येतात. त्यासाठी रेल्वे हा चांगला पर्याय आहे. यंदा सर्वसाधारण दि. 8 सप्टेंबरपासून भाविक आपल्या गावाकडे दाखल होणार आहेत. त्यामुळे दि. 8 सप्टेंबरचे रेल्वे आरक्षण शुक्रवार, दि. 11 मे रोजी होणार आहे. दि. 9 सप्टेंबरचे 12 मे रोजी, दि. 10 सप्टेंबरचे 13 मे रोजी, दि. 11 सप्टेंबरचे 14 मे रोजी, हरतालिका दि. 12 सप्टेंबरचे 15 मे रोजी आणि गणेशोत्सवाच्या दिवशी म्हणजेच 13 सप्टेंबरचे आरक्षण 16 मे रोजी होणार आहे.

यंदा पाच दिवसांचे गणेशविसर्जन सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठीचे आरक्षण दि. 20 मे रोजी होणार आहे. दि. 23  सप्टेंबरला अनंतचतुर्दशी असून, त्यासाठीचे आरक्षण दि. 26 मे रोजी होणार आहे. त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत; परंतु बहुतांशी चाकरमानी दीड, पाच, सात, नऊ दिवसांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करून आपल्या चाकरीच्या ठिकाणी जातात, तर काही चाकरमानी गौरीसाठी विशेष करून गावाकडे येतात. त्यामुळे कुटुंबासह गावाकडे येत असताना आगाऊ आरक्षण केले जाते. सोशल मीडियावरून मागील दोन दिवस या आगाऊ तारखा शेअर केल्या जात आहेत.  कन्फर्म आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी पुढील आठवड्यापासून चाकरमान्यांची लगबग सुरू होणार आहे.