Wed, May 22, 2019 11:13होमपेज › Konkan › रेल्वे इंजिन घसरले 

रेल्वे इंजिन घसरले 

Published On: Sep 02 2018 1:13AM | Last Updated: Sep 01 2018 11:10PMकणकवली : वार्ताहर

कोकण रेल्वे मार्गावर नांदगाव रेल्वे स्टेशनपासून 4 कि.मी. अंतरावर शनिवारी पहाटे 4.15 वा.च्या सुमारास पोकलँड मशीन वाहून नेणार्‍या रेल्वेचे इंजिन घसरले. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी येथून आलेल्या अपघात सहाय्य पथकाकडून इंजिन ट्रॅकवर आल्यानंतर सुमारे तीन तासाने वाहतूक सुरळीत झाली. इंजिन घसरल्याने या कालावधीत धावणार्‍या गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. 

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळल्यास ती बाजूला करण्यासाठी पोकलँड मशीनचा वापर केला जातो. हे पोकलँड मशीन घेऊन वैभववाडीच्या दिशेने शनिवारी पहाटे जात असलेल्या मशिनरीवाहक रेल्वेचे इंजिन नांदगाव रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रुळावरून बाजूला घसरले. इंजिन घसरल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे मार्ग वाहतुकीस बंद झाल्याने कणकवलीच्या दिशेने येणारी रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर वैभववाडी स्टेशनवर तर दादर-तिरूनववेली एक्स्प्रेस राजापूर, मेंगलोर सुपरफास्ट आडवली तर कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरी स्टेशनवर थांबविण्यात आली होती. तर मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्स्प्रेस कणकवली व नांदगाव स्टेशनवर, कोचिवेल्ली डेहराडून कणकवली स्टेशनवर, डबलडेकर सिंधुदुर्गनगरी स्टेशनवर थांबविण्यात आली.

इंजिन घसरल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी येथून कोकण रेल्वे प्रशासनाने अपघात सहाय्य पथक पाचारण केले. सुमारे अडीच तासाच्या प्रयत्नानंतर घसरलेले इंजिन पूर्ववत रेल्वे रुळावर आणण्यात आले. त्यानंतर रेल्वे मार्ग वाहतुकीस सुरळीत झाल्याने सकाळी 7.15 वा. च्या सुमारास वैभववाडी स्टेशनवर थांबविलेली रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर सर्वप्रथम मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर इतर गाड्या पुढे पाठविण्यात आल्या. वाहतूक ठप्प झाल्याने शनिवारी दिवसभरात कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्या उशिराने धावत होत्या.

त्यामध्ये कोकणकन्या एक्स्प्रेस तीन तास 11 मिनिटे, तुतारी एक्स्प्रेस 1 तास 48 मिनिटे, डबलडेकर 2तास 30 मिनिटे, मंगला एक्स्प्रेस 5 तास उशिराने धावत होती. दिवा पॅसेंजर व मांडवी एक्स्प्रेसही उशिराने धावत होती. गाड्या उशिराने धावत असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.