होमपेज › Konkan › कोकणच्या पर्यटन झोळीत रेल्वेचं भरभरुन योग‘दान’!

कोकणच्या पर्यटन झोळीत रेल्वेचं भरभरुन योग‘दान’!

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 03 2017 1:07AM

बुकमार्क करा

सिंधुदुर्ग : दीपक शिंगण

अलीकडच्या काही वर्षांत कोकणात येणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. कोकणात रेल्वेचे आगमन होण्याआधी पर्यटक विमाने थेट गोव्याला जात असत. मात्र, कोकणात रेल्वेचे आगमन झाले आणि गोव्याबरोबरच कोकणची एकत्रित सफर करण्याचा मार्ग पर्यटकांसाठी खुला झाला. 

देशाची राजधानी दिल्ली तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईहून रेल्वेमुळे पर्यटकांना थेट गोवा तसेच कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सिंधुदुर्ग गाठता येत असल्याने कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्गातील गणपतीपुळे, मार्लेश्‍वर, पावस, नाणीजधाम, मालवण व  तारकर्लीला जाण्याची पूर्वी काहीसा खडतर असलेला प्रवास आता सुकर झाला आहे.

कोकणपट्ट्यात येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  विदेशी पर्यटकांसाठी राजस्थानातील  ‘पॅलेस ऑन व्हील’च्या धर्तीवरील डेक्कन ओडिसी या पंचतारांकित सुविधांनी सज्ज रेल्वे गाडीसह मुंबईहून गोव्यापर्यंत धावणारी वातानुकूलित डबल डेकर ट्रेन तसेच अलीकडेच विमानाप्रमाणे सुविधांनी सज्ज असलेली ‘तेजस एक्स्प्रेस’ देशात सर्वात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर सोडण्याचा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलेला निर्णयही पर्यटनवृद्धीसाठी चांगलाच फायदेशीर ठरतो आहे.

या गाडीसह ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ने देशाच्या  आर्थिक राजधानीतून अवघ्या चार तासांत रत्नागिरी, पाच तासांत सिंधुदुर्ग तर सात तासांत गोवा गाठणे पर्यटकांना शक्य झाले आहे. पर्यटनपूरक सुविधा तसेच वेगवान प्रवास यामुळेच कोकण  रेल्वे मार्गावरील जनशताब्दी, डबल डेकर तसेच ‘तेजस एक्स्प्रेस’ या तिन्ही गाड्यांना पर्यटक चांगली पसंती देताना दिसत आहेत.

‘वीकेंड ट्रीप’साठी कोकणला पसंती

रेल्वेने पर्यटकांची पूर्वीची कोकणात येताना असलेली अवघड वाट दुमजली डबल डेकर ट्रेन, वाय-फाय, ऑनबोर्ड मनोरंजनासाठी एलईडी स्क्रीन, स्वयंचलित दरवाजे अशा ‘हायटेक’ सुविधांसह तेजस एक्स्प्रेस सोडून सोपी केली. तसेच ‘कोरे’ मार्गावर आधीपासून धावणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला  ‘विस्टाडोम’ हा खास पर्यटनपूरक कोच जोडल्याने पर्यटक मुंबई ते गोवा या जनशताब्दीने 270 रुपयात होणार्‍या प्रवासासाठी 3 हजार रुपये इतके तिकीट मोजून  ‘तेजस’ने  प्रवास करु लागले आहेत.