Tue, Jun 25, 2019 21:27होमपेज › Konkan › गणेशोत्सवात प्रकल्पग्रस्त करणार रेल रोको

गणेशोत्सवात प्रकल्पग्रस्त करणार रेल रोको

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांची बैठक रविवारी रत्नागिरी येथे झाली. यावेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील बहुसंख्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गणेशोत्सवात रेलरोको करण्याचा निर्धार करण्यात आला. 

कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात कृती समिती पदाधिकारी व कोकण रेल्वेचे पदाधिकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. बेलापूर मुख्य कार्यालयात कृती समितीने 200 उमेदवारांची यादी दिली होती. त्या उमेदवारांना भरतीत का वगळण्यात आले? ही कारणे मान्य नाहीत. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला जाब विचारणार असेही ठरवण्यात आले.

सहसचिव प्रभाकर हातणकर म्हणाले, या लढ्यामध्ये सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे. आज आपण सुमारे 5 हजार प्रकल्पग्रस्त एकत्र आहोत, परंतु आज कोकणातील सुमारे 22 हजार प्रकल्पग्रस्तांना एकत्र आणण्याचे काम आपणा सर्वांना केले पाहिजे. कोकण रेल्वेने प्रकल्पग्रस्तांवर जो वेळोवेळी अन्याय केला आहे, त्याविरोधात लढा तीव्र करण्याची गरज असल्याचे सांगितले. जर का परप्रांतीय उमेदवारांसाठी नोकरीच्या जागा दिल्या तर हक्क असलेल्या उमेदवारांचे काय? म्हणूनच सर्व पदभरती कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधूनच कराव्यात, अन्यथा कृती समिती आपला लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा देण्यात आला.

कार्याध्यक्ष विनायक भगवान मुकादम यांनी प्रकल्पग्रस्त उमेदवारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. आपल्याला पुराव्यासह माहिती मिळत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष संतोष चव्हाण म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील सर्व उमेदवार पात्र असताना कोकण रेल्वेने संपूर्ण राज्यातील उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सवलत का दिली? आम्ही कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी काय करायचे? आम्ही आमच्या जमिनी कवडीमोल दराने प्रकल्पांना का म्हणून द्यायच्या? आमच्यावर अन्यायच होतोच ना? 

न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचे ठरवण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी पुढे होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नोटा बटण दाबून मतदान करण्याचा निर्धार केला. या बैठकीला कृती समितीचे पदाधिकारी व रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.