Tue, Mar 19, 2019 09:37होमपेज › Konkan › रायगड उत्खननातून मिळाला शिवकालीन ठेवा

रायगड उत्खननातून मिळाला शिवकालीन ठेवा

Published On: Mar 26 2018 1:30AM | Last Updated: Mar 25 2018 11:03PMमहाड : प्रतिनिधी

रायगड किल्ला संवर्धन मोहिमेच्या निमित्ताने सुरू केलेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वस्तू मिळाल्या आहेत. शिवकालीन नाणी, बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे, कडी, कोयती, साखळी, साखळदंड यासह अनेक शिवकालीन वस्तूंचा ठेवाच सापडला आहे.

छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगड या राजधानीच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन सुरू आहे. या सर्व वस्तूंच्या पाहणीसाठी गडावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी शिवभक्‍तांकडून करण्यात येत आहे. ज्या 32 मण सिंहासनावर छत्रपती शिवरायांनी बसून राज्यकारभार केला, त्या सिंहासनाचा मात्र अद्याप शोध लागू शकलेला नाही. महाराष्ट्र शासनामार्फत दोन वर्षांपूर्वी रायगड महोत्सवाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाबाबत पहिले पाऊल उचलले होते. मागील वर्षी रायगड संवर्धन योजनेसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यानंतर या संवर्धन मोहिमेने वेग घेतला आहे.

समाधीस्थानाची दुरुस्ती

महाड : प्रतिनिधी  किल्ले रायगडावर जाण्याचा प्रमुख मार्ग असलेल्या महादरवाजा ते होळीचा माळ या मार्गावरील पदपथाच्या (पायर्‍यांची) दुरुस्तीचे काम प्राथमिक अवस्थेत सुरू झाले आहे. याचबरोबर श्री जगदीश्‍वर मंदिर व छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थानाचे रासायनिक पद्धतीने दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. गडावरील विविध भागात असणार्‍या घरांच्या उत्खननाबाबत काम हाती घेण्यात आले असून, सरदारांच्या निवासस्थानांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच गडावर अशा पद्धतीचे थेट उत्खनन केले जात असून, या दरम्यान गंगासागर तलाव, हत्ती तलाव, दारूकोठा, आदी परिसरातून तोफांकरिता वापरण्यात येणारे गोळे आढळून आले आहेत.

मूर्ती, घरांतील विविध वापरायच्या वस्तू, कडी, कोयती, साखळी, साखळदंड, आदींचा यामध्ये समावेश आहे. गडावरील गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कोलींब तलाव, हनुमान टाकी या ठिकाणच्या स्वच्छता व दुरुस्तीचे काम तसेच पाण्याची आरोग्यदृष्ट्या तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी सामाजिक संस्थांनी केलेल्या सफाईदरम्यान या तलावांतून अनेक वस्तू सापडून आल्या होत्या.

Tags : Raigad, excavation, Start, kokan news