होमपेज › Konkan › शिक्षक भरतीतील रॅकेटने राज्यभरात खळबळ

शिक्षक भरतीतील रॅकेटने राज्यभरात खळबळ

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 9:37PMरत्नागिरी : प्रतिनिधी

डिसेंबर 2017 मध्ये राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेऊनही भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यातच सध्या गुण वाढवून दिले जाणारे रॅकेट राज्यभर सक्रिय झाले असून त्याबाबतच्या संभाषणाची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत औरंगाबाद व  मुखेड ( जि. नांदेड)येथील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. गेले आठ वर्षे शिक्षक भरती झालेली नाही, त्यातच हा नवा वाद उद्भवल्याने भावी शिक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

राज्यभरात सुमारे 24 हजार जागांसाठी भरती होईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी गेल्या वर्षी 12 ते 21 डिसेंबर दरम्यान अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी झाली. या परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 97 हजार 520 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 71 हजार 348 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षार्थ्यांना त्यांचा निकाल परीक्षा झाल्यावर समजला होता. त्यानंतर राज्य सरकारने या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जानेवारी महिन्यात जाहीर केला. मात्र, या निकालात आणि परीक्षा झाल्यावर दाखवलेल्या गुणांमध्ये 1 ते 30 गुणांपर्यंत तफावत होती. याबाबतचे आक्षेप देखील विद्यार्थ्यांनी नोंदविले होते. ही परिस्थिती असतानाच अद्याप निकालाच्या हार्डकॉपी परीक्षार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे निकालाच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

भरतीची परीक्षा झाल्यानंतर चार महिने उलटून गेले तरी अद्याप भरती प्रक्रियेचा पत्ताच नाही. त्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील डीएड, बीएडधारकांनी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणही छेडले. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिकांना आरक्षण मिळावे, यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोर्चेही काढण्यात आले.  एका बाजूला भरती लवकर करण्याची ओरड होत असताना आता गुण वाढवून देण्याच्या क्‍लिपने खळबळ उडाली आहे.

अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, या चाचणीचे गुण वाढवून देणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. निम्मे पैसे सुरुवातीला द्या आणि उर्वरित गुण वाढल्यानंतर द्या, असे आमिषच विद्यार्थ्यांना देण्यात येत असून याबाबतचे संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे आठ वर्षे भरतीची वाट पाहणार्‍या भावी शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परिणामी अभियोग्यता चाचणी आणि पवित्र पोर्टलच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. 

या संभाषणाबाबत डीएड्, बीएड् स्टुडण्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्‍त यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी व त्यातील दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. संबंधितांची चौकशी करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्‍वासन संघटनेला पोलिस प्रशासनाने दिले. अशा प्रकारांना बळी पडू नका, असे आवाहनही राज्याध्याक्ष संतोष मगर यांनी डीएड्, बीएड् धारकांना केले आहे. 2010 मध्येही शिक्षक भरतीमध्ये असे प्रकार घडून आले होते. ही बाब विचारात घेऊन त्यावेळीही रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये  विरोधाचा लढा उभारण्यात आला होता. परंतु त्यावेळी गैरप्रकारांची चौकशी झाली नसल्याचे डीएड्, बीएड् धारकांमधून सांगण्यात येत आहे.