Thu, Jul 18, 2019 17:21होमपेज › Konkan › माणसे व सज्जनशक्‍तींचे संघटन हे संघाचे कार्य

माणसे व सज्जनशक्‍तींचे संघटन हे संघाचे कार्य

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:43PM

बुकमार्क करा
मालवण : प्रतिनिधी

शिवाजी महाराजांनी माणसे जोडली, नाती जपली म्हणून जीव धोक्यात घालणारा मावळा तयार झाला. माणसे जोडणे हेच संघाचे कार्य आहे. सज्जनशक्‍तीचे एकत्रीकरण हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे. सकल हिंदू समाजाचे संघटन त्यांच्यात प्रज्वलीत करणे हे संघाचे काम आहे, असे प्रतिपादन अ. भा. वि. प. चे कार्यकर्ता व पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री देवदत्त जोशी यांनी केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत यांनी पालघर ते गोवा या तटीय भागात सज्जनशक्‍ती संचयनासाठी 7  जानेवारी रोजी 263 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या अभूतपूर्व संकल्पाअंतर्गत मालवण तालुक्यातील गणवेशधारी स्वयंसेवक आणि संघप्रेमी नागरिक यांच्या एकत्रीकरणाचा भव्य सोहळा अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात  झाला.  प्रमुख पाहुणे म्हणून सागर विज्ञान अभ्यासक सारंग कुलकर्णी यांनी गतआयुष्यातील संघ स्मृतींना उजाळा दिला. शाश्वत मासेमारी आणि नीतीमान पर्यटन तसेच रोजगार संधीचा पाठपुरावा करून मालवणवासियांनी समृद्ध जीवन जगावे अशी अपेक्षा व्यक्‍त केली. 

प्रास्ताविक करताना मालवण तालुका संघचालक अ‍ॅड. समीर गवाणकर यांनी देशापुढील आव्हानांवर संघ कशाप्रकारे मात करत आहे, याची माहिती दिली.   या 92  वर्ष वयाच्या संघटनेचा सर्वत्र उदोउदो होत असून जगभर तिच्या अनोख्या कार्यपद्धतीचा अभ्यास होत आहे. राजकारणात भारतीय जनता पार्टी, धार्मिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी जगतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ याखेरीज वनवासी कल्याण आश्रम,  पूर्वांचल विकास परिषद आदींसह सुमारे दीड लाखांहून अधिक सेवाकार्य भारतभर चालत आहेत. त्याखेरीज विदेशातील हिंदूंना हिंदू स्वयंसेवक संघ या संघटनेमार्फत संघटित केले जात आहे.  

1 जानेवारी हे नवीन वर्ष जगभर साजरे केले जात असताना आता भारतात  गुढीपाडव्यापासून नववर्षाचे स्वागत करण्याची संकल्पना मोठ्या प्रमाणात  सुरू झाली आहे.  मागील वर्षांत अनेक चढउतार देशाने अनुभवले पण संघ डगमगला नाही. संघाचे सेवाकार्य पाहून प्रेरणा घेऊन कार्य सुरू करणे गावोगावातील पोहोचविणे संघाची खरी ओळख निर्माण करणे आहे. साहिल राऊळ यांनी हिंदू चेतना संगमसाठी तयार केलेले ‘शब्द नव्हे ही मनामनातून उठे हिंदू चेतना’ हे गीत  सादर केले. प्रवीण पारकर यांनी ‘पाहुनिया तट भेदांचे हिंदुत्व गर्जुनी उठले’ हे भावपूर्ण व समयोचित गीत गायले.  सूत्रसंचालन डॉ. अश्विन दिघे यांनी केले.