Sat, Jun 06, 2020 06:43होमपेज › Konkan › झाडांच्या कृत्रिम बेटातून पाणी शुद्धीकरण

झाडांच्या कृत्रिम बेटातून पाणी शुद्धीकरण

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:02PMरत्नागिरी : विशाल मोरे

शहरातील इमारतींचे नाल्यात सोडलेले सांडपाणी वाहत जाऊन पुढे स्वच्छ पाण्यात मिसळते. यातून ते स्वच्छ पाणीही दूषित होते. अशी परिस्थिती फणशी येथे असून ते पाणी शुद्धीकरणासाठी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी जैविक पद्धतीच्या रिड-बेड तंत्रज्ञानाचा वापर करत झाडांचे कृत्रिम बेट तयार केले आहे. यातून बाहेर पडणार्‍या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्‍त अन्य सर्व कामांसाठी होऊ शकतो.शहरातील आरोग्य मंदिर येथील परकार हॉस्पिटलच्या पाठीमागून सुरू झालेला हा नाला के. सी. जैननगर, ओसवालनगर, फणशी, फगरवठार, सावंतनगर, परटवणे अशा 5 कि.मी. मार्गे समुद्राला मिळतो. या नाल्यात हॉस्पिटलमधील पाणी, इमारतीतील सांडपाणी सोडले जाते. परटवणे येथून वाहणार्‍या नदीचा उगम फणशी हनुमान मंदिर येथे होतो. मात्र, यापुढे काही अंतरावरच हा नाला या नदीत मिळतो. यामुळे येथून पुढे वाहणारे सर्व पाणी दूषित असते. 

काही वर्षांपूर्वी ज्या नदीत मुले पोहायची, त्या नदीला आता बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याच मुलांनी आता नदीला पुनरुज्जीवन प्राप्त करून देण्याचे ठरवले आहे. त्याचा एक भाग म्हणून रत्नागिरी गव्हर्न्मेंट  पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअर साईल शिवलकर व देवराई जलसंधारण तज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये, ओमकार गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रीड-बेड तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यामध्ये दोन ठिकाणी बंधारे बांधून हे दूषित पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे सर्व गाळ खाली बसून वरच्या थरातील पाणी पुढे वाहते. या बंधार्‍यांच्या पुढे काही अंतरावरच लोखंडी तार्‍यांच्या जाळीचा बॉक्स तयार करून त्यामध्ये दगड-गोटे आणि मातीचा भराव टाकून त्यात कर्दळी आणि अळू ही झाडे लावली आहेत.यातून झाडांचे कृत्रिम बेट तयार करण्यात आले आहे. या झाडांची मुळे आणि खोडांमध्ये गाळ आणि बॅक्टेरिया अडकून राहत असल्यामुळे हे पाणी शुद्ध होते. यापुढे वाहणार्‍या पाण्याची लॅबोरेटरीत तपासणी केल्यानंतर हे पाणी 70 टक्के शुद्ध झालाचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासाठी राजस भोसले, मिथिलेश मयेकर, मंथन खारवडकर, जितेंद्र देवरुखकर, अभिषेक कासेकर, चेतन कांबळे, विराज हरचकर, अनिमेष कीर, विश्‍वेश कीर, आकाश भाटकर यांनी मेहनत घेतली आहे.

Tags : Konkan, Purification, water, artificial, island, trees