Tue, Jul 23, 2019 11:34होमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्गात साजरा होणार पु. लं. चा जन्मशताब्दी सोहळा!

रत्नागिरी-सिंधुदुर्गात साजरा होणार पु. लं. चा जन्मशताब्दी सोहळा!

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:27PMकणकवली : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्‍तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षास 8 नोव्हेंबर 2018 ला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त मंडणगड ते दोडामार्ग अशा पसरलेल्या कोकणपट्टीतील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था एकत्र आल्या आहेत. या विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रत्येक तालुक्यात 8 नोव्हेंबर या दिवशी एकाच वेळी पु. लं. च्या प्रसिध्द कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. तसेच वर्षभराच्या कालावधीत आणखीही विविध उपक्रम साजरे होणार आहेत. 

रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थेचे पदाधिकारी नितीन कानविंदे यांनी याबाबतची माहिती रविवारी येथील आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आर्ट सकर्लचे श्रीरंग प्रभुदेसाई, मनोज देसाई, सुनिल वनजू, संगीता वनजू, मित्र संस्था शिरगांवचे सचीन देसाई, सावंतवाडी क्षितीज संस्थेचे बाळ पुराणिक, आचरा येथील सुरेश ठाकूर, नवनाथ भोळे, माधव गावकर, आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, शाम नाडकर्णी, मनोज मेस्त्री यावेळी उपस्थित होते. 

नितीन कानविंदे म्हणाले, आर्ट सर्कल रत्नागिरी या संस्थेमार्फत गेली 10 वर्षे आम्ही पुलोत्सव साजरा करत आहोत. पु. लं. ची जन्मशताब्दी जवळ आली असताना ती फक्‍त रत्नागिरीतच का? कोकणातल्या सर्वच तालुक्यात का नाही? या विचाराने कामाला सुरुवात झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शहरात काम करणार्‍या संस्थांशी आम्ही संपर्क साधला आणि सार्‍यांचेच होकार आले. काही तरी एकत्रित करूया यावर एकमत झालं. हा सुध्दा पु. लं. इफेक्ट म्हणावा लागेल. 

महाराष्ट्राच्या साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्‍वाला व्यापूनही  उरलेले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. या व्यक्तीमत्त्वाने सर्वच क्षेत्रात मुशाफिरी करून आपला स्वतंत्र ठसा उमटवला. तसं करत असताना समस्त मराठी मनाला आपलसं केलं. पु. लं. च्या जन्मशताब्दीची सुरूवात 8 नोव्हेंबरला होत आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर जगभर वसलेला मराठी माणूस या शताब्दी सोहळ्याची तयारी करू लागला आहे. मग या आनंदसोहळ्यात आपला कोकणी माणूस मागे कसा राहील, कारण पु. ल. हे कोकणचे जावई होते. 

सुनीता ठाकूर या अत्यंत प्रतिभाशाली आणि तेजस्वी व्यक्‍तीशी पु. लं. नी लग्नगाठ बांधली. पु. लं. च्या दैवी प्रतिभेला आपल्या तितक्याच दैवी पण शिस्तशीर प्रतिभेने सतत प्रवाही ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पु. लं.चा जनशताब्दी सोहळा  हा  सुनिता देशपांडे यांच्या उल्लेखाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही असे कानविंदे म्हणाले. 

पु. लं. च्या जन्मशताब्दी सोहळ्यात आतापर्यंत संस्कारभारती दापोली, संस्कारभारती खेड व आर्ट सोसायटी, लोकमान्य स्मारक चिपळूण, ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर, अभिरूची देवरूख, मित्रमेळा राजापूर, संस्कृती-लांजा, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली, बाबा वर्दम थिएटर कुडाळ, क्षितीज सावंतवाडी, साने गुरूजी कथामाला व अ. भा. नाट्यपरिषद मालवण, किरात वेंगुर्ले, आर्ट सर्क ल देवगड, मित्र शिरगाव आणि आर्ट सर्कल रत्नागिरी या संस्था सहभागी झाल्या आहेत. 8 नोव्हेंबर या एकाच दिवशी सायंकाळी एकाच वेळी पु. लं. शी निगडीत विविध कलाकृती सादर होणार आहेत. हा जन्मशताब्दी सोहळा वर्षभर चालू राहील आणि आपआपसातील सांस्कृतिक उपक्रमांची देवाणघेवाण वाढून सुजाण रसिकवर्ग निर्माण होण्यास मदत होईल आणि हे फक्‍त पु. लं. मुळेच होऊ शकतं असा विश्‍वास नितीन कानविंदे व अन्य संस्था पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला.