Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Konkan › जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2 लाख मिरी कलमे उपलब्ध करून देणार : शिवाजीराव शेळके

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2 लाख मिरी कलमे उपलब्ध करून देणार : शिवाजीराव शेळके

Published On: Jul 02 2018 1:44AM | Last Updated: Jul 02 2018 12:31AMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2 लाख मिरीची कलमे उपलब्ध करुन देण्याचे कृषि विभागाचे उद्दिष्ट असल्याचे अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील वराड ग्रामपंचायत येथे कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन व कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.  व्यासपीठावर  जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, जि. प. चेविविध पदाधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी, तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामस्थ  उपस्थित होते.

कै. वसंतराव नाईक यांच्या आदर्शांवर चालण्याचा कृषी विभागाचा मानस असल्याचे सांगून श्री. शेळके म्हणाले, कृषी विभागामार्फत जिल्ह्यामध्ये अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. तसेच मसाला पिकांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1500 एकर जमिनीवर मसाला पिकांची लागवड कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. नारळ, सुपारी यांच्या बागांपासून मिळणारे उत्पन्‍न किमान 25 टक्क्यांनी वाढावे यासाठी या बागांमध्ये मसाला पिकांची लागवड करावी. मसाला पिकांच्या क्षेत्राखाली यंदा 10 टक्के वाढ झाली आहे. मागेल त्याला अवजार या योजनेखाली गेल्यावर्षी 8 कोटी रुपयांच्या अवजारांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच यंदाच्या वर्षी 15कोटी रुपयांच्या अवजारांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावनापर भाषणामध्ये श्री. ठाकूर यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच तालुक्यामध्ये 10 वी व 12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पशुसंवर्धन विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पशुसंवर्धन मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी पार पडले. तसेच कृषीविषयक विविध योजनांविषयी शेतकर्‍यांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.