ओरोस : प्रतिनिधी
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची नावे पाठविण्याच्या तारखेत 30 जून 2 जुर्लेपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीने महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांना या वर्षीपासून नवीन स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासन अनुदानित तसेच खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अनुदानित अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांची नावे 31 मे पर्यंत पाठविण्याचे आदेश विद्या प्राधिकरणकडून देण्यात आले होते. तसेच https://www.research.net/r/SYFF2M3 या लिंकवर वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने अनेक शिक्षक बाहेरगावी गेले होते. अनेक ठिकाणच्या इंटरनेटच्या असुविधेमुळे त्यांना माहिती भरणे शक्य झालेले नाही. नोंदणी न झाल्याने संबंधित शिक्षकांना या प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, यासाठी नावनोंदणीच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.