होमपेज › Konkan › राजापुरात रुग्णालयासाठी प्रस्ताव द्या : चंद्रकांत पाटील 

राजापुरात रुग्णालयासाठी प्रस्ताव द्या : चंद्रकांत पाटील 

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 8:29PM



राजापूर : प्रतिनिधी

राजापूर  येथे  सुपर  मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी शिफारस रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना दिले आहेत. 

मुंबई-गोवा महामार्गालगतच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना औषधोपचार मिळण्यासाठी जवळच्या ठिकाणी कुठेही अद्ययावत सोयीयुक्त असे रुग्णालय उपलब्ध नाही. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत तसेच विविध सणांनिमित्त मुंबईतून कोकणात जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. देश विदेशातील पर्यटकही येथील विविध पर्यटनस्थळांना भेटी देतात. अशातच मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. परंतु राजापूरमध्ये अद्ययावत असे रुग्णालय नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाही, त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या मार्गावरील बहुतांशी अपघातग्रस्तांना कोल्हापूर व मुंबई येथील रुग्णालयात दाखल करावे लागते. 

रुग्णालयासाठी राजापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा देण्यात यावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची अधिवेशनाच्या दरम्यान भेट घेतली. यासंदर्भात एक लेखी पत्र देऊन शिफारसही केली आहे. याची दखल घेऊन चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना दिले आहेत. 

आ. राजन साळवी यांचा पाठपुरावा

राजापूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेची अडचण लक्षात घेऊन राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याची मागणी पालकमंत्री वायकर यांच्याकडे केली होती. राजापूर तालुक्यातील लोणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा मोकळा असलेला भूखंड वापरात आणून त्यावर हे रुग्णालय बांधण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती.