होमपेज › Konkan › लांजातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा

लांजातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:39PM

बुकमार्क करा

लांजा  : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये प्रकल्प बाधित झालेल्या लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा शहर, कुवे व पुरागाव येथील प्रकल्पबाधित भू-धारकांवर महामार्ग प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे. येथील प्रकल्पबाधितांना योग्य तो दर निश्‍चित करून ग्रामीण भागाप्रमाणेच म्हणजे चारपट दराने मोबदला देण्यात यावा व स्थानिक भूधारकांचे होणारे नुकसान टाळावे, अशी निवेदनाद्वारे मागणी लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केंद्रीय महामार्ग  व अवजड मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे 

लांजा शहरातून गेलेल्या मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणामघ्ये लांजा शहर, कुवे येथील नागरिकांच्या जमिनी प्रकल्पात बाधित होत आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने येथील प्रकल्पबाधितांना अल्प दर दिला आहे. या निवेदनात म्हटले आहे की,  लांजा शहर, कुवे व पुरागाव या ठिकाणची भूसंपादन  निवाडे तयार करून  मोबदला वाटपाचे काम सुरु झाले आहे. कुवे व पुरागाव या नगरपंचायत हद्दीतील गावामध्ये  शासनाचा दर सन 14 मध्ये महामार्गाबाबत जमिनीचा दर प्रतिगुंठा 76हजार व लांजा शहराला दर 1 लाख 38हजार असा असताना मात्र, नुकसान भरपाई देताना एकाच नगर पंचायत हद्दीमध्ये कुले व पुरागाव या गावांना 12हजार ते 60हजार प्रतिगुंठा वलांज बाजारपेठेसाठी 1लाख10हजार ते 1 लाख 30 हजार असे वेगवेगळे दर लावण्यात आले आहे.

देवधे, वाटूळ, वाकेड,पातेरेगाव या नगर पंचायत हद्दीशेजारील गावांचा नुकसान भरपाईच्या अभ्यास करता असे निदर्शनास येते कि या गावांना महामार्गावरील जमिनी गृहित धरून सर्व भूधारकांना एकूणच दर 68हजार ते 75 हजार प्रतिगुंठा असा निश्‍चित करून सुमारे 2 लाख 72 हजार ते 2लाख90 हजार या दराने जमिनीचा मोबदला वाट होत आहे. यामधून नगरपंचायत हद्दीतील प्रकल्पबाधित भूधारकांना मोेठ्या प्रमाणात नुकसानीला समोरे जावे लागत असल्याचे आ. साळवी यांनी म्हटले आहे.

लांजा नगरपंचायत मागील पाच वर्षांमध्ये निर्माण झाली असून कुवे व पुरागाव ही गावे नगर पंचायतीमध्ये समाविष्ट असली तरी तुलनात्मकदृष्ट्या त्यांचे राहणे ग्रामीण आहे यास लांजा नगरपंचायतीचा दर्जाही  ‘क’ आहे. मुंबई -गोवा महामार्ग बाजारपेठेतील  विस्थापित होणार्‍या खोकेधारकांना त्यांच्या खोक्याची भरपाई मिळावी व त्यांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे त्याचप्रमाणे काही व्यावसायिक, घरमालक यांच्या मिळकतीची आकारणी योग्य प्रकारे केलेली नाही त्यांचा फेरविचार व्हावा व नगरपंचायतीमधील  लांजा, कुवे व पुरागाव या गावातील प्रकल्पबाधित भूधारकांना योग्य तो दर निश्‍चित करून ग्रामीण भागांप्रमाणेच चारपट दराने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार राजन साळवी यांनी केली आहे