Sun, Dec 15, 2019 02:43



होमपेज › Konkan › धरणात बुडून मेलो तरी गाव सोडणार नाही! 

धरणात बुडून मेलो तरी गाव सोडणार नाही! 

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 1:37AM




वैभववाडी ः प्रतिनिधी

जोपर्यंत नागरी सुविधांसह पुनर्वसन व मोबदला वाटप होत नाही तोपर्यंत गाव सोडणार नाही. प्रसंगी धरणात बुडून मेलो तरी चालेल, असा इशारा अरुणा प्रकल्प बाधित भोम गावातील प्रकल्पग्रस्तांनी दिला.

जोपर्यंत नागरी सुविधा पूर्ण होत  नाहीत, तोपर्यंत धरणात पाणीसाठा करू नये; अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही  या प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना दिला.

वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घळभरणीचे काम झाले आहे. या वर्षी  धरणात  पाणीसाठा करण्यात  येणार असल्याने पाटबंधारे विभागाने आखवणे, भोम, नागपवाडी येथील बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना घरे खाली करण्याचे व पुनर्वसन गावठाणात  स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी लाऊड स्पीकरवरून तसे जाहीर आवाहन प्रकल्पग्रस्तांना करण्यात येत होते. मात्र, भोम येथील प्रकल्पग्रस्तांनी याला तीव्र विरोध करत या वाहनाला गावात सदर आवाहन करण्यास प्रतिबंध करत हुसकावून लावले होते. तसेच भोम गावच्या हद्दीत सुरू असलेले प्रकल्पाचे उत्खनन रोखून धरलेे आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, ठेकेदार कंपनीचे मॅनेजर किरण यांनी मंगळवारी भोम येथे प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली. या बैठकीला विलास कदम, अशोक बांद्रे, अंकुश पाटेकर, सुनंदा जाधव, वनिता जांभळे, सुनील कदम, वामन बांद्रे  यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

अरुणा प्रकल्पाची घळभरणी प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रा.पं.ला कळविण्यात आलेले नाही. नेमकी कोणाच्या सांगण्यावरुन घळभरणी करण्यात आली? असा सवाल   करीत ज्यांनी तुम्हांला घळभरणी करायला सांगितली आहे, त्या दोन्ही समित्यांना आमच्या समोर आणा,असा आग्रह भोम येथील प्रकल्पग्रस्तांनी लावून धरला.

हा प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेतील प्रकल्प आहे. आम्ही कोणाच्या सांगण्यावरुन नाही तर राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करीत आहोत. तुमचे जे काही प्रश्‍न असतील ते सोडविण्याचा प्रयत्न करुया. यावर्षी धरणात पाणी साठा होणार आहे. त्यामुळे विस्थापन करणे अपरिहार्य आहे. आता पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे स्थलांतर करावे लागणार आहे. आपण सहकार्य करावे असे आवहन श्री. डवरी यांनी केले. मात्र प्रकल्पग्रस्तांनी आक्रमकपणे अनेक प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांचे आवाहन अमान्य केले.

पुनर्वसन गावठाणात अद्याप पाणी, वीज व इतर सुविधा नाहीत. तात्पुरते राहाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पत्रा शेड या गुरांना बांधण्यासही लायक नाहीत.आम्ही माणसे आहोत, मुला बाळांना, वयोवृध्दांना घेऊन या शेडमध्ये पावसाळा कसा काढायचा? असा सवाल केला. अद्याप अनेक लोकांना मोबदला मिळालेला नाही. अशा अवस्थेत उर्वरित पंधरा दिवसात स्थलांतर कसे करणार? असा सवाल करीत आम्ही कोणत्याही परिस्थितीत गाव सोडणार नाही. तसेच पुढे कामही करु देणार नाही असा इशारा दिला आहे.

अरुणा खोर्‍यात तणावपूर्ण शांतता

अरुणा प्रकल्पाची घळभरणीचे पहिल्या टप्प्यातील काम पाटबंधारे विभागाने पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप आखवणे, भोम, नागपवाडी या गावांतील जवळपास 80 टक्के घरांचे विस्थापन बाकी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे अरुणा खोर्‍यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. गावात मंगळवारी पोलिसांच्यासोबतच दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते.