Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Konkan › कोकणातील ‘काजू’ला कोल्हापूरचे आव्हान

कोकणातील ‘काजू’ला कोल्हापूरचे आव्हान

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 02 2018 8:26PMहर्णै : वार्ताहर

कोकणातील काजू बियांना यंदा कोल्हापूरच्या काजूबियांशी टक्‍कर द्यावी लागणार असून या दोन्ही भागातील हंगाम यंदा एकत्रच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मागणी घटल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील काजूबियांना दर मिळवण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

कोल्हापूर आणि परिसरातील काजू कोकणातील काजूनंतर 15-20 दिवसांनी बाजारात येण्यास सुरूवात होते. पण यंदा कोकणची काजू बी तयार होण्यासाठी तेवढाच काळ विलंब होणार आहे. त्यातही यंदा कोल्हापूर आणि परिसरातील काजू बियांचे उत्पादन लक्षणीय असल्याने हा माल मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे. त्याचवेळी कोकणची काजू बी बाजारात आल्यानंतर दरासाठी या दोघांना आपापसांत स्पर्धा करावी लागणार आहे.

मुळात कोकणातील हंगामाची सुरूवात तब्बल 15 ते 20 दिवसांनी लांबल्याने बियांचे दर आजमितीला दीडशे रूपयांवर स्थिरावले आहेत. मात्र आवक सुरू झाल्यानंतर हाच दर 110 ते 120 रूपयांपर्यंत घसरेल, असा अंदाज आता व्यक्‍त होत आहे. त्यातच जागतिक बाजारपेठेतील मागणी घटल्याने परदेशी काजू बी यंदा स्वस्त होणार आहे. त्याचा परिणामही कोकणच्या काजूवर पडण्याची चिन्हे आहेत.

मुळात अर्थसंकल्पात परदेशी काजूवरील आयातशुल्क पूर्ण माफ करण्याचा निर्णय झाल्यानंतर काजू बियांचे दर उतरण्याचे संकेत होते. सध्या ही आयात शुल्क माफी 50 टक्के झाली असून महिन्याभरात ती पूर्ण संपुष्टात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांतून काजू बियांची आवक सुरू झाली आहे. गुजरात आणि केरळमध्ये या बियांचा मोठा साठा दाखलही झाला आहे. सध्या त्याचा दर प्रतिकिलो दीडशे रूपयांपर्यंत आहे. सर्वसाधारणपणे या कालावधीत काजूची आवक कोकणात वाढत असल्याने गुजरात आणि कर्नाटकचे व्यापारी येथे वळतात. पण कोकणातील हंगामाला विलंब झालेला असतानाच परदेशी बियांची आवक झाल्याने या राज्यातील व्यापार्‍यांनी कोकणाकडे सध्या दुर्लक्ष केले आहे.

यावर्षी व्हिएतनाम सरकारने त्यांच्या प्रक्रिया उद्योगातील उलाढाल 30 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच त्यांच्याकडून यंदा परदेशी काजूबियांची आयात कमी होणार आहे. काजू प्रक्रिया उद्योगातील जगातील सर्वात मोठा देश म्हणून व्हिएतनामचा नावलौकीक आहे. साहजिकच त्यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील काजूबियांचे दर कमी होतील, असा अंदाज आहे.
गेल्या चार पाच वर्षांपासून जगातील प्रक्रिया उद्योगांकडून वाढलेली मागणी आणि उत्पादनातील घट या पार्श्‍वभूमीवर काजूबियांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 50 ते 60 रूपयांवरून दीडशे रूपयांपर्यंत पोचले होते. गेल्यावर्षी त्याचा फायदा कोकणातील शेतकर्‍यांनाही झाला. मात्र, या दरवाढीने प्रक्रिया उद्योगांना जबरदस्त फटका बसला. 

याबाबत लांजा- गवाणे येथील प्रसिद्ध रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे जयवंत विचारे यांनी सांगितले की, एका बाजूला गुजरात व्यापार्‍यांनी मार्चमध्ये कोकणकडे पाठ फिरवलेली असतानाच कोल्हापूर आणि परिसरात होणारी काजू बीही कोकणाबरोबरच बाजारात येणार आहे. त्यामुळे कोकणच्या काजूबियांची मागणी यंदा घटण्याची चिन्हे आहेत. मात्र, तरी बियांचे दर 120 रूपयांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.