Wed, Jan 29, 2020 23:50होमपेज › Konkan › दापोलीत ‘आधार’ची परवड

दापोलीत ‘आधार’ची परवड

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:29PM

बुकमार्क करा
दापोली : प्रवीण शिंदे

दापोली तालुक्यातील आधारकार्डधारकांना ‘आधार’शी मोबाईल रजिस्टर करणे, नावात बदल करणे, जन्म तारखेत बदल करणे अशा अनेक दुरुस्त्यांसाठी आधारकार्ड केंद्र गाठावे लागत आहे. मात्र, आधारकार्ड केंद्रावर दिवसाला 40 अर्ज इतकीच मर्यादा असल्याने दापोलीमध्ये लोकांची परवड  थांबता थांबत नाही.

दापोली तालुक्यामध्ये दाभोळ आणि दापोली हे दोन आधारकार्ड केंद्र असून दापोलीपासून दाभोळ हे 40 किमी अंतरावर आहे. दापोलीतील आधारकार्ड केंद्राशी जवळपास 100 हून अधिक गावे जोडली गेली आहेत. मात्र, दापोली हे आधार्ड केंद्र अनेक गावांना एस.टी.प्रवासासाठी सोयीचे असल्याने अनेकजण आधारकार्ड दुरुस्तीसाठी दापोलीत धाव घेतात. मात्र, 40 नंबरची मर्यादा असल्याने कित्येक लोकांना आधारकार्डचे काम न झाल्याने परत जावे लागते. सकाळी 6 वाजता दापोलीतील एस.टी स्टँड नजीक असलेल्या आधारकार्ड केंद्रावर लोक रांगा लावून उभे असतात.

शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज, बँक आदी शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये आधारकार्ड हे सक्तीचे केले आहे. मात्र सक्तीच्या केलेल्या आधारकार्डमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यास आधारकार्ड केंद्रामध्ये जाऊन दुरुस्ती करावी लागते. मात्र, आधारकार्ड केंद्र येथे गेल्यास मर्यादेमुळे अनेक लोकांची कामे खोळंबत आहेत.

याबाबत शासनाने काहीतरी उपाययोजना करुन दापोली शहरामध्ये अन्य आधारकार्ड केंद्राची उभारणी करणे गरजेचे आहे. कारण भल्या पहाटे ग्रामीण भागातून आधारकार्ड दुरुस्तीसाठी वयोवृद्ध लोकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना यावे लागत आहे. अनेकवेळा आधारकार्ड केंद्रावर काम होत नसल्याने रित्या हाताने परत जावे लागते. याबाबत दापोली तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतची दखल घ्यावी, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.