Mon, Jun 24, 2019 21:55होमपेज › Konkan › जिल्ह्यातील धबधब्यांवर क्‍लस्टरद्वारे खासगी सुरक्षा

जिल्ह्यातील धबधब्यांवर क्‍लस्टरद्वारे खासगी सुरक्षा

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 9:02PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने  महत्त्वाची असणार्‍या हंगामी धबधब्यांवर दुर्घटना टाळण्यासाठी  धबधब्यांचे क्‍लस्टरद्वारे खासगी सुरक्षासह अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली. 

कोकणात पाऊस सक्रिय झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ धबधब्यांकडे मोठ्या प्रमाणावर वाढतो. मात्र, अशा धबधब्यांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांसह अन्य सुविधांचा अभाव असल्याने अनेक वेळा आपत्तींसारख्या दुर्घटनेत मदत आणि निवारण करताना अडचणी येतात. यासाठी जिल्ह्यात असलेल्या आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या धबधब्यांचे तालुकानिहाय किंवा जिल्हानिहाय समूह तयार करण्याच्या सूचना पर्यटन विभागाला देण्यात आल्या आहेत.

या समूहगटाद्वारे या धबधब्यांवर खासगी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये राजापूर तालुक्यातील धूतपापेश्‍वर, सवतकडा,  चिपळूण तालुक्यात सवतसडा , रत्नागिरी तालुक्यातील निवळी, निवेंडी, पानवल असा मंडणगडमध्ये चिंचवडी, रघुवीर घाट आणि लांजा तालुक्यातील खोरनिनको, संगमेश्‍वरातील मार्लेश्‍वर आदी धबधब्यांचा समावेश करण्यात आला आहे. या धबधब्यावर खासगी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध करुन देताना त्यांच्याकडे अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, सतर्कतेसाठी अलर्ट  सिस्टिम आणि सिसीटिव्हीसारखी निरीक्षण यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी  तटरक्षकदल, गिर्यारोहक संघटना आणि स्थानिक स्तरावरील तातडीची आपत्ती निवारण पथकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.