Thu, Apr 25, 2019 13:47होमपेज › Konkan › सार्व. विहिरींवरील खासगी पंप ग्रा.पं.ने तत्काळ हटवावेत!

सार्व. विहिरींवरील खासगी पंप ग्रा.पं.ने तत्काळ हटवावेत!

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 8:51PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

आचरा हिर्लेवाडी येथील सार्वजनिक विहिरीवर बसविलेला खासगी पंप तत्काळ हटविण्यात यावा. जर कोणी सार्वजनिक विहिरींवर बेकायदेशीररित्या पंप बसवित असतील तर संबंधितांवर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करायला हवी. येथील  जनतेला पाण्यासाठी प्रशासनाच्या दारात येण्याची वेळ येवू देवू नका, असा इशारा जि. प.अध्यक्ष  सौ. रेश्मा सावंत यांनी  दिला. 

मालवण  तालुका स्कूल येथे तालुक्यातील विकासकामांची आढावा  बैठक जि.प.अध्यक्षांच्या उपस्थितीत झाली.सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जि.प.सदस्य सरोज परब, हरी खोबरेकर, माधुरी बांदेकर, पं.स. सदस्य अजिंक्य पाताडे, कमलाकर गावडे, श्री. पावसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

चिंदर येथील तीन विहिरींची कामे अपूर्ण ठेवणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.अपूर्ण कामे मार्च 18  पर्यंत पूर्ण न झाल्यास ही कामे आपोआपच रद्द होणार असल्याचे अभियंता वैभव वाळके यांनी सांगितले. मसदे चुनवरे सरपंच हे ग्रामपंचायतीत येत नसल्याने विकासकामांचा निधी अखर्चित राहिला असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव जि.प.कडे पाठविण्यात यावा. जर एखाद्या सरपंचामुळे गावची विकासकामे रखडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही.संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, असे  सौ. सावंत यांनी स्पष्ट केले. 

14 व्या वित्त आयोगातून ग्रा.पं.ना देण्यात आलेल्या सन 15-16  च्या निधीतील एकही रूपया काही ग्रा.पं.कडून खर्च केला नाही.त्यामुळे संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणदिवे यांनी दिले. 15-16 चा निधी खर्च झालेला नसताना 16-17  चा निधी देण्यात आला आहे आणि आता काही दिवसांत 17-18  चाही निधी दिला जाणार आहे. शासन निधी देत असताना जर ग्रा.पं.ने तो योग्यप्रकारे खर्च करत नसेल तर भविष्यात पुन्हा जि.प.कडे हा निधी परत येणार आहे.

याला सर्वस्वी ग्रा.पं. जबाबदार राहतील. 50  हजार रुपयांच्या वरील सर्व कामे ई-टेंडर आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. प्रक्रियेनुसार कामे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. राणदिवे यांनी सांगितले.वायरी ग्रा.पं.कडून पर्यटकांकडून कर वसुली केली जाते. मात्र सिंधुदुर्ग किल्ल्यावर हव्या तशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. जे बायो टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात स्वच्छता नाही. त्यामुळे स्वच्छता तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून न दिल्यास ग्रा.पं.ची कर वसुली बंद केली जाईल,असा इशाराही श्री. रणदिवे यांनी दिला.