रत्नागिरी : प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टी असो की गणपती सण... सुट्टीचा कालावधी संपत आला की चाकरमानी मिळेल त्या वाहनाने मुंबई, पुणे गाठण्यासाठी प्रयत्न करीत असतात. रेल्वेमध्ये तर उभ्याने प्रवास करायलाही जागा नसल्याने नित्याचे वाद अगदी प्रत्येक डब्यात दिसत आहेत. त्यामुळे खासगी बसेसचा आसरा घेणार्या चाकरमान्यांची लूट खासगी लक्झरी चालकांकडून सुरू आहे. मुंबईसाठी स्लीपरचा दर 1300 तर सिटींगचा दर 800 रूपये आहे. सध्या दुप्पट दराने चाकरमान्यांना प्रवास करावा लागत आहे.
मे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात व जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबई गाठण्यासाठी चाकरमान्यांची पावले ट्रॅव्हल्स ऑफिसकडे वळू लागली आहेत. रेल्वेची आरक्षणे तीन-तीन महिने आधीच हाऊस फुल्ल झाली आहेत. त्यातच एसटीची शिवशाही ही फूल होत असून, जादा गाड्यांनाही मोठी गर्दी आहे. त्यामुळे मुंबई गाठण्यासाठी चाकरमानी मिळेल त्या गाडीचे तिकीट बुकिंग करीत आहेत. क्रॉफर्ड मार्केट किंवा बोरवलीपर्यंत जाण्यासाठी स्लीपर गाडीला 1300 रूपये एका व्यक्तीला मोजावे लागत आहेत. तर सिटींगसाठी आठशे रुपये मोजावे लागत आहे.
प्रवासाचे दर दुप्पट करून आकारले जात आहेत. विशेषत: स्लीपरचे तिकीटदर या सुट्टीच्या हंगामात दुप्पट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्रवासी नाहक भरडले जात आहेत. खासगी वाहतुकीच्या तिकीट आकारणीवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. वास्तविक उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी होणे अपेक्षित असताना मात्र हा विभाग ग्राहकांकडून तक्रार येण्याच्या प्रतीक्षेत आहे. दुप्पट दराने का होईना, पण मुंबईला वेळेत पोहोचायला मिळतेय यामुळे प्रवासीही फारशा तक्रारी करत नाहीत.