Wed, Jul 17, 2019 20:14होमपेज › Konkan › कोकण कृषी विद्यापीठ भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य : फुंडकर

कोकण कृषी विद्यापीठ भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य : फुंडकर

Published On: Feb 24 2018 9:24PM | Last Updated: Feb 24 2018 9:20PMदापोली : प्रतिनिधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठ भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी दापोलीत केली. 

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 37 व्या पदवी प्रदान सोहळ्याला ना. फुंडकर यांची उपस्थिती लाभली. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भरती प्रक्रियेवेळी प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठात सामावून घेण्यात आले नाही. त्यावेळेस वेगवेगळे नियम, निकष व पेपरदेखील वेगळ्या पद्धतीचे दिले जातात, अशी संतप्‍त भावना श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने व्यक्‍त करण्यात आली. यावर ना. फुंडकर यांनी विद्यापीठातील अधिकार्‍यांना समज देऊन स्थानिकांना प्राधान्य द्या, असे सांगितले. तसेच मागील अधिवेशनात रोजंदारी करणार्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागला असता. मात्र, कुलगुरु बैठकीला हजर नसल्याने तो विषय राखून ठेवण्यात आल्याची माहिती ना. फुंडकर यांनी दिली.

विद्यापीठात तीनशेहून अधिक रोजंदारीवर कार्यरत आहेत. यातील काही सेवेत कायम न होता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अशांना मरणोत्तर कायम करुन घेणार का, असा सवाल करण्यात आला होता. याची दखल घेत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कृषी विद्यापीठाला धारेवर धरले आहे. विधानभेतही हा प्रश्‍न ना. कदम यांनी प्रकर्षाने मांडला आहे. मात्र, विद्यापीठातील अधिकार्‍यांची उदासीनता दूर होत नाही. त्यामुळे हा विषय ना. फुंडकर यांनी प्राधान्याने हाताळावा, अशी विनंती संघटनेच्या प्रतिनिधींनी केली. विद्यापीठ भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील काहींना प्रकल्पग्रस्त दाखवून सामावून घेण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावर, माहिती घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल, असे ना. फुंडकर यांनी सांगितले. तसेच मजुरांना मिळणारा मोबदलाही वाढीव स्वरूपात मिळेल, असे सांगण्यात आले.

यावेळी आ. संजय कदम, कुलगुरु तपस भट्टाचार्य, भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊ इदाते, श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष संतोष भुवड, उपाध्यक्ष दत्तात्रय भुवड उपस्थित होते.