Sat, Mar 23, 2019 01:58होमपेज › Konkan › येगाव शाळेचे सुशोभिकरण ठरतेय लक्षवेधी

येगाव शाळेचे सुशोभिकरण ठरतेय लक्षवेधी

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:48PMआरवली ः वार्ताहर

चिपळूण तालुक्यातील येगाव शाळा नं. 1  सजावट व उपक्रमांमुळे चर्चेत आली आहे.  शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेल्या 10 लाख रुपयांच्या शैक्षणिक उठावाने शाळेची सजावट आणि इमारत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी शाळेने जि. प. चा आदर्श शाळा पुरस्कार पटकविला होता.

मुख्याध्यापक अरविंद भंडारी यांनी शिक्षक संजय घाग, संभाजी निर्मळ, प्रकाश ठोंबरे या शिक्षकांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी शैक्षणिक उठावाला सुरूवात केली. 

संगणक आल्यानंतर डिजिटल शाळा करण्याचा मानस व्यक्‍त केला. सावर्डे-तळवडे रस्त्यावरून शाळेची वास्तू रंगांमुळे उठून दिसू लागली. शाळेचे अंतरंग आणि बाह्यरंग उजळून निघाले आहे.

शाळेच्या कमानीपासून पंधरा फुटांच्या अंतरावर वाचनकुटीची संकल्पना अफलातून आहे. चार भिंतीबाहेर अध्ययन, अध्यापन वाचनकुटीत करता येते. शाळेच्या परिसरात नदीतून वाहणारे पाणी अडवून त्यावर भाजीपाला केला आहे. शाळेच्या प्रक्षेत्रावर पिकवलेला भाजीपाला पोषण आहारामध्ये वापरला जातो. गड, किल्ले शाळेच्या पटांगणात उभारले आहेत. आमदार अनंत गाडगीळ यांनी शाळेच्या विकासासाठी एक लाखाचा निधी दिला. शाळेला भेट दिल्यानंतर आ. गाडगीळ यांनी आपण निधी चांगल्या शाळेला दिल्याची भावना व्यक्‍त केली. राजाराम चव्हाण (पुणे), संजय चव्हाण यांनी आमदार निधी आणण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावली. जिल्हा परिषदेची आदर्शवत शाळा म्हणून येगाव या शाळेकडे पाहिले जात आहे.

शाळेतील वैशिष्ट्ये

भाजीपाला मळा, कमळ टँक, स्वच्छ आणि प्रशस्त स्वच्छतागृह, हँड वॉश स्टँड, वाचन कुटी, काष्ठशिल्प, ग्रामीण साधनांचा संग्रह, भौतिक साधने, स्वावलंबन केंद्र, प्रशस्त बाग, संरक्षक कठडा, आकर्षक रंगसजावट.