Sun, Apr 21, 2019 03:49होमपेज › Konkan › मिरजोळे, कोळंबेतील भूस्खलन पिचिंगद्वारे रोखणार

मिरजोळे, कोळंबेतील भूस्खलन पिचिंगद्वारे रोखणार

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:26PMरत्नागिरी : प्रतनिधी

गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे तालुक्यात मिरजोळे पाठोपाठ कोळंबे-मांडवकरवाडी येथे भूस्खलन झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी पाहणी केल्यानंतर जमीन खचण्याचे प्रकार थांबविण्यासाठी पिचिंग पद्धतीने भूस्खलन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे आणि कोळंबे येथे मुसळधार पावसामुळे जमीन खचल्याने येथील शेती आणि गावांना धोका निर्माण झाला होता. या भूस्खलनामुळे ऐन खरिपाच्या कालावधित शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतजमिनीच्या नुकसानासह काही झाडेही उन्मळून गेली आहेत. भात लावणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला होता. कोळंंबे येथे शेतजमीन असून लोकवस्ती भूस्खलन झालेल्या ठिकाणापासून खूपच दूरवर आहे.  त्यामुळे लोकवस्तीला कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जूनमध्ये सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाल्याने हा प्रकरा घडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, तूर्तास पाऊस ओसरल्याने येथील धोका टळला आहे. आगामी काळातही पावसाने येथील शेत जमिनीला धोका संभवण्याच्या द‍ृष्टीने  जिल्हाधिकार्‍यांसह तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी या भागाची पाहणी  केली होती. त्यानुसार प्रशासनाच्या भूवैज्ञानिकांसह कोकण रेल्वेच्या भूवैज्ञानिकांचाही सल्ला प्रशासनाने हो धोका टाळण्यासाठी घेतला आहे.  

त्यानुसार जमिनीचे  पिचिंग पद्धतीने   खच्चीकरण रोखण्यात येणार आहे. यामध्ये एकच सलग भिंत उभारण्यापेक्षा टप्प्या-टप्पाने भिंत उभारल्यास माती खाली ढासळण्यास आळा बसणार आहे. तसेच भिंतींना पाणी जाण्यासाठी मार्ग ठेवल्यास येथील भूस्खलन टळणार असल्याचा निर्वाळा प्रशासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिला आहे. त्यानुसार पाऊस ओसरल्यानंतर  त्वरित हे काम  हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर येथे कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात  येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.