Wed, Jun 26, 2019 18:13होमपेज › Konkan › ‘चिपी’चा १२ तारखेचा मुहूर्त साधण्यासाठी सज्ज

‘चिपी’चा १२ तारखेचा मुहूर्त साधण्यासाठी सज्ज

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 10:15PMकुडाळ : प्रमोद म्हाडगुत

पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळेच्या माळरानावर गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बुधवारी (दि. 12)  ‘हरितालिका’ सणादिवशी ‘चिपी ग्रीनफिल्ड’ विमानतळावर विमानाची चाचणी घेतली जाणार आहे. याकरिता विमानतळाची विकासक (ठेकेदार) म्हणून काम करणार्‍या आयआरबी ही नामांकित कंपनी मुहूर्तासाठी आपल्या स्तरावरून सर्वतोपरी तयारीत आहे. परिणामी गेल्या कित्येक वर्षांनी तमाम सिंधुदुर्गवासीयांची स्वप्नवत सिंधुदुर्गातील जमिनीवर उतरणार्‍या विमानाची  ‘प्रतीक्षा’ खर्‍या अर्थाने पूर्ण होईल; पण नियमित विमान उड्डाणासाठी जिल्हावासीयांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर या पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री,खा.नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात विमानतळाची घोषणा करून चिपी माळरानावर विमानतळाच्या कामाचा शुभारंभही केला होता, पण पुढे या कामात राजकारण आल्याने  अनंत अडथळे आले. पण ठेकेदार विकास कंपनीने  या अनंत अडथळ्यांची शर्यत पार करत विमानतळाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांची परिणीती म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी  चाचणीसाठी सज्ज राहत असलेले चिपी विमानतळ. युती शासनाच्या काळात विमानतळाची घोषणा झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्गवासीयांच्या मनात आकाशात विमान झेपावू लागले होते. मात्र आता प्रत्यक्षात आयआरबी कंपनीने विमानतळ विमान उतरण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. त्यातच पालकमंत्री, खासदार यांनी  विमान उतरण्याची तारीख जाहीर केल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू  झाल्या आहेत. 

चिपी-परूळे माळरानावरील 271 हेक्टर जागेवर हे विमानतळ आकाराला येत आहे. या विमानतळासाठी आयआरबी कंपनी 520 कोटी रुपये खर्च करीत आहे. कराराने आयआरबी विकासक कंपनीने 95 वर्षाकरीता एमआयडीसीकडून जमीन ताब्यात घेतली आहे. अनेक अडथळे पार करत विमानतळाचे काम आयआरबी कंपनीने पूर्णत्वाकडे नेले आहे. या विमानतळासाठी 5 कि.मी. ची धावपट्टी भविष्याचा विचार करून ठेवण्यात आली आहे. सद्यस्थितीत 2.5 कि.मी ची धावपट्टी विमानासाठी तयार करण्यात आली आहे. विकासक आयआरबी कंपनी 12 सप्टेंबरच्या विमानतळ तपासणी मुहूर्तासाठी युध्दपातळीवर रात्रंदिवस एक करत कामे पूर्ण करत आहे. कंपनीच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या बैठकांचाही जोर वाढला आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी व विविध परवानग्यांसाठी त्या-त्या विभागाची कमिटी चिपी विमानतळाला भेटी देत आहेत. मोटॉरोलॉजिकल इक्विपमेंट बसवण्यासाठीची कमिटीही चिपी विमानतळावर दाखल झाली आहे. 

जगभरातील लाखो लोक सिंधुदुर्गलगतच्या गोवा राज्यात येतात. गोवा विमानतळावर विमाने पार्क करण्यासाठीसुध्दा जागा नाही. गोव्यातील वाढत्या पर्यटकामुळे सिंधुदुर्गातील स्वच्छ किनापट्टी भागाकडे पर्यटक वाढू लागले आहेत.आता तर चिपी विमानतळ आकाराला येत असल्यामुळे पर्यटकांसाठी हा मोठा सुखद धक्का असून जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीने ही फार मोठी गुंतवणूक आहे.पर्यटकांच्या पसंतीत उतरेल या दृष्टीने नामांकित अशा आयआरबी कंपनीने चिपी विमानतळाच्या कामात कोणतीही कमतरता राखलेली नसल्याचे दिसून येते.

उडाण योजनेत चिपी विमानतळ असल्याने प्रवास स्वस्त

चिपी विमानतळ सुरू झाले की, त्यानंतर केंद्रशासनाच्या ‘उडे देश का आम नागरिक’(उडाण) या उपक्रमांतर्गत  ‘रिजनल कनेक्टिव्हीटी’च्या योजनेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळाचा समावेश निश्‍चित केला जाणार आहे. सामान्य माणसालाही हवाई सेवेचा लाभ किफायतशीर किमतीत घेता यावा व छोट्या शहरांना देशाच्या हवाई नकाशावर आणण्याच्या उद्देशाने केंद्रसरकारने ही योजना जाहीर केली असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खा. विनायक राऊत यांनी दिली.