Wed, Jul 17, 2019 08:51होमपेज › Konkan › ‘पूर्वमोसमी’ने खेडमध्ये तीन लाखांचे नुकसान

‘पूर्वमोसमी’ने खेडमध्ये तीन लाखांचे नुकसान

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 9:06PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस  पडत आहे. बुधवार दि. 6 रोजी सकाळी 8 वाजे पर्यंत एकूण 63.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या 24 तासांत तालुक्यात सरासरी 17.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील कुळवंडी येथे एक घर व संरक्षक भिंतीची पडझड होऊन तब्बल 2 लाख 95 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. 

तालुक्यातील तळे येथील एक  महिला विजेचा धक्‍का बसून भाजल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, खेडमध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने शेतकरीदेखील कामाला गती देत आहेत. खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा, विजांसह मेघगर्जना करत पावसाच्या सरी कोसळत आहेत. यावर्षी जून महिना सुरू झाल्यापासून सरासरी एकूण 63.84 मि.मी.एवढी पावसाची नोंद झाली आहे.  बुधवारी संपलेल्या चोवीस तासांत तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाच्या सरींमध्ये काही ठिकाणी घर, गोठे, संरक्षक भिंती आदींचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कुळवंडी येथील जांभूळगाव येथे पावसामध्ये दि.4 रोजी विनोद  राजाराम निकम यांच्या घर व गोठ्याची भिंत कोसळून 1 लाख 95 हजार रुपयांचे तर विजय महादेव निकम यांच्या घराच्या जागे सभोवतालची संरक्षक भिंत कोसळून 1 लाख रूपयांचे नुकसान झाले तर मंगळवार दि.5 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सूमारास तालुक्यातील तळे चिंचवाडी येथील नीलम संतोष पालांडे (30) ही महिला पाऊस पडत असताना विजेचा धक्‍का बसून भाजली आहे.  नीलम यांच्या पोटाला भाजल्याने तिला रात्री कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या मुसळधार सरींमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम महसूल कर्मचार्‍यांमार्फत करण्यात येत आहे. 

शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतकर्‍यांनी कामांना गती दिली आहे. नद्या, तलाव व विहिरींतील पाण्याच्या पातळीत काही अंशी वाढ झाली असून त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त लोकवस्त्यांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पालिकेने शहरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा साफ करण्याची मोहीम हाती घेतली असली तरी अद्याप काही भागांमध्ये पावसाच्या सरीला सुरुवात झाल्यानंतर गटारांमध्ये साचलेल्या कचर्‍यामुळे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसासोबत येणार्‍या सोसाट्याच्या वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून विद्युतपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरू आहे. 

विद्युतपुरवठा खंडित होण्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर होत असून काही ठिकाणी विजेच्या उपलब्धतेनुसार अनियमीत वेळी पाणी पुरवठ्यासाठी नद्यामधून पंपाद्वारे पाणी खेचण्यात येत आहे. त्यामुळे गढूळ पाणी नळांद्वारे येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोगराई पसरू नये म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन येथील न.प. प्रशासनातर्फे शहरातील नागरिकांना तर आरोग्य विभागातर्फे तालुक्यातील ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांना करण्यात येत आहे.