Sun, Mar 29, 2020 07:51होमपेज › Konkan › देवरुख, देवडे-किरबेट परिसरात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस

देवरुख, देवडे-किरबेट परिसरात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस

Last Updated: Mar 25 2020 9:58PM
देवरुख / राजापूर : पुढारी वृत्तसेवा
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी संगमेश्वर तालुक्यात देवरुख शहरासह साखरपा परिसरातील देवडे, किरबेट परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह   मान्सूनपूर्व पाऊस पडला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. राजापुरातही गुढीपाडव्याच्या सकाळच्या प्रहरी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. सुमारे एक तासाहून अधिक काळ जोरात पाऊस पडला. 

कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसने सगळ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अशावेळी संगमेश्वर तालुक्यात बुधवारी दुपारी अचानक ढगांचा गडगडाट व्हायला सुरुवात झाली. देवडे- किरबेट परिसरात तर चक्क पावसाने हजेरी लावली. 

दुपारी 2 वाजल्यापासून या परिसरात ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यानंतर वादळी वार्‍यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. अचानक वरुणराजाचे आगमन झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तर पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात गारवा झाला. गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तालुक्यातील देवरुख, साखरपा व संगमेश्वर परिसरातही दुपारनंतर वातावरण मळभी झाले होते. देवरुख शहरात  15 मिनिटे  पाऊस पडला.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या यावेळच्या सणाला संकटाची झालर असल्याने नागरिकांनी यावेळी अत्यंत साधेपणाने हा सण साजरा केला. शहरात बरेच ठिकाणी गुढीकरिता विक्रीसाठी आणलेले बांबू यावेळी रस्त्याकडे तसेच पडून असल्याचे पाहायला मिळाले. अशातच जिल्ह्यावर मळभी वातावण तसेच काही तालुक्यांमध्ये बिगरमोसमी पाऊस कोसळल्याने गुढीपाडव्याच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.