Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Konkan › सोशल मीडियामुळे प्रमोद जाधवला मदतीचा हात

सोशल मीडियामुळे प्रमोद जाधवला मदतीचा हात

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 8:59PMदापोली : प्रवीण शिंदे

सोशल मीडिया हे नेहमी वादाचा विषय ठरत आहे. याच सोशल मीडियामुळे अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. मात्र, हाच सोशल मीडिया दापोली तालुक्यातील कोंढे शिगवणवाडी येथील प्रमोद जाधव या तरुणासाठी धावून आला असून अनेकांनी त्याला मदतीचा हात दिला.

दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी दापोली येते दुचाकी अपघातात प्रमोद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यास तत्काळ उपचारासाठी मुंबईतील के. ई. एम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्या पायावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. मात्र, त्या यशस्वी झाल्या नाहीत. प्रमोद हा त्यानंतर चार पाच महिने जागेवरच होता. दरम्यान,  मुलगा हातचा जाऊ नये यासाठी जाधव कुटुंबाने अनेक मार्गांतून मदत मिळावी म्हणून धडपड सुरु केली. मात्र, कायम पदरी निराशाच पडली.

शेवटी मुलाच्या भविष्यासाठी कर्जबाजरी होऊन प्रमोद याला मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर चार शस्त्रक्रिया झाल्या. यासाठी सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च जाधव कुटुंबासाठी अवघड ठरू लागला. त्यामुळे त्यांना काही सुचेनासे झाले. अशावेळी सोशल मीडियावर प्रमोद  याच्या मदतीसाठीचा मेसेज सर्व ग्रुपवर फिरू लागला आणि बघता-बघता दोन दिवसांत साठ ते सत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत प्रमोद याला रोख स्वरूपात तर बँक खात्यात जमा झाली आहे. ही मदत प्रमोदच्या शस्त्रक्रियेसाठी उपयुक्‍त ठरली आहे. त्यामुळे प्रमोदसाठी सोशल मीडिया तारणहार ठरला आहे. 

याद्वारे मदतीचा ओघ सुरुच असून सामान्य माणुसकीच्या नात्याने अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत. प्रमोदसाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन देखील जाधव कुटुंबियांनी केले आहे. त्यामुळे सोशल मीडियातून मदतीचा लागलेला हातभार प्रमोदसाठी लाख मोलाची मदत ठरणार आहे.

व्हॉट्स अ‍ॅपचा असाही सामाजिक उपयोग

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र ठरत आहे. त्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने उपयोग होत आहे. आठ दिवसांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅपवर फिरणार्‍या संदेशामुळे काही निरपराध लोकांचे जीव गेले. अफवा पसरवून केवळ संशयाच्या बळावर काही मारले गेले. मात्र, त्याच व्हॉट्स अ‍ॅपने जखमी प्रमोद जाधवसारख्या व्यक्‍तीला मदतीचा हात दिला. त्यामुळे सामाजिक उपक्रमासाठी सकारात्मक भावनेतून हेच व्हॉट्स  अ‍ॅप कसे उपयोगी पडते याच उत्तम उदाहरण आहे.