Sun, May 26, 2019 21:13होमपेज › Konkan › घरासाठी २ हजार ४८३ जणांचे अर्ज

घरासाठी २ हजार ४८३ जणांचे अर्ज

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:49PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : वार्ताहर

पंतप्रधान निवास योजने अंतर्गत हक्‍काच्या घरासाठी रत्नागिरी शहरातून तब्बल 2 हजार 483 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दाखल अर्ज पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू असताना सर्व्हर डाऊन झाल्याने काम ठप्प होते. तब्बल दोन महिन्यांनी नगर परिषदेच्या नावाने नवीन लॉग ईन आयडी उपलब्ध झाल्यानंतर अर्ज नोंदवण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख असलेल्या व नावावर स्वत:चे घर नसलेल्या कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे शासनाने धोरण आहे. त्याकरिता पंतप्रधान निवास योजना आखण्यात आली आहे.

अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना वैयक्‍तिक घरकुलासोबत रत्नागिरी शहरात झोपडपट्टी भागात राहणार्‍यांना हक्‍काचे घर मिळणार आहे. पंतप्रधान निवास योजना ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घर’ हे ब्रीद घेऊन आखण्यात आली आहे. शहरी भागासाठी असलेली ही योजना विविध चार गटांत राबवण्यात येत आहे. 

या योजनेच्या अनुषंगाने आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत व अल्प उत्पन्न गटासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख रुपयांपर्यंत असले पाहिजे, तसेच या योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी हे शहराच्या हद्दीतील रहिवाशी असणे आवश्यक आहे. ‘आयएचएसडीपी’ योजनेपासून वंचित राहिलेल्या मात्र त्या झोपडपट्टीत 2000 पूर्वीपासून राहणार्‍या कुटुंबासाठी स्वतंत्र योजना आहे. त्या झोपडपट्टीच्या जागेवरच निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्याला 330 चौरस फुटांपर्यंतचे घरकुल देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल.

केंद्र आणि राज्य शासनाचे प्रत्येकी दोन लाख रूपयांचे अनुदान घरकुलास देण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल व कमी उत्पन्न घटकासाठी परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वत:च्या मालकीचे घर नसणार्‍यांना, परंतु, पालिका हद्दीतील रहिवासी असणार्‍या अशा कुटुंबासाठी ही योजना आहे. मध्यम आर्थिक उत्पन्न गटातील कुटुंबांना एक हजार व 1200 चौरस फुटाचे घरकुल घेता येणार आहे. कुटुंबाचे सहा ते 12 लाख व 12 ते 18 लाख अशा दोन उत्पन्न गटांसाठी ही योजना आहे. यात 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्न गटाला चार तर 12 लाखांवरील उत्पन्न असलेल्या गटाला तीन टक्के व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

मध्यम उत्पन्न गटातील दोन्ही गटांत नऊ आणि 12 लाखापर्यंतच्याच कर्जावर व्याज अनुदान देण्यात येणार आहे. या गटातील लाभार्थ्यांना 330, 1000 आणि 1200 चौरस फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात घेता येईल. रत्नागिरी शहरातून यासाठी चार गटांतून 2 हजार 483 अर्ज दाखल झाले. त्यांपैकी 1 हजार 144 अर्ज ऑनलाईन नोंदवण्यात आले. परंतु, सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने काम दोन महिने ठप्प होते. आता नव्याने लॉग ईन आयडी देण्यात आल्यानंतर अर्ज नोंदणीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.