Fri, May 24, 2019 02:25होमपेज › Konkan › प्रभाते मनी : सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म

प्रभाते मनी : सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 8:50PM
रत्नागिरी : बाबा ढोल्ये

भगवंत म्हणतात, तुझ्या जाणिवांच्या पलिकडे मी आहे. सर्व चराचरात मी भरलेला आहे. तू शोधायचा प्रयत्न करतोस पण तुला माहीत नाही. निष्काम कर्म कर. विशुद्ध प्रेमभावना बाळग. आपपरभाव करू नकोस. सर्वांना आपले मान. तुझ्या प्रसन्न मनोदेवतेचे दुसरे स्वरूप मी आहे. नीट बघ! माझ्याकडे भेदाभेद नाही. हा माझा, तो माझा अशी संकुचित भावना नाही. मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यापेक्षा स्वच्छ आचरणाचे पालन कर... मी अशा कर्त्यांच्या शोधात असतो.

भगवंत म्हणतात, तू विचित्र आहेस. माणसांच्या गर्दीत तू पण हरवतोस. तुम्ही माणसं अजब वागता. एकमेकांना प्रेम देता. एकमेकांना अंतर न देण्याचे वचन देता. शरीराने विभन्न असूनही मनाने एकत्र येता. सलगी घट्ट करून कायम बिलगता आणि कधी कशावरून काय होते ते समजून न घेता सहज एकमेकांपासून दूर होता. अरे असे का वागता? मने ओळखायला शिका. मने जुळताना वेळ लागतो मात्र तुटताना काहीही निमित्त पुरते. कारणमिमांसा न करता, पूर्ण ओळख न होता तुम्ही एकमेकांचा अनादर का करता? जीवन अनमोल आहे असे म्हणत या अनमोल जीवनातील काही मनस्वी क्षणांना तुम्ही का पारखे होता? मी सतत सांगत आलो आहे. तुझ्यासह संपूर्ण प्राणीमात्रावर मी लक्ष ठेवून आहे. जेव्हा तुम्ही असे वागता तेव्हा तुझ्याच मनातून येणार्‍या प्रेमभावनेचा मांडलेला हा परिचित, अपरिचितचा डाव मला पाहवत नाही. 
तुझ्या मनोदेवतेला तू कधी विचारतोस काय रे? मनोदेवतेला मानत चल. तिचा निर्णय घे. कोणत्याही कार्याची सुरुवात मनोदेवतेपासून कर. ती सर्वप्रथम प्रसन्न असायला हवी. मनोदेवतेला निश्‍चिंत भावनेने विचार. ती सांगेल तुला योग्य, अयोग्य काय आहे.पण तुला तितका वेळ नाही. निर्णय प्रक्रियेत बुद्धिमान असूनही तुला अनेकदा अपयश पचवावे लागते. कारण मन हे चंचल आहे. हे माहीत असूनही तू निश्‍चयी मनाने स्वतःला विचारत नाहीत. तुझी मनोदेवता तुला कठीण प्रसंगी सांगत असते. पण तुला घाई इतकी असते की स्वतःविषयी विचार करायला फुरसत नसते. अरे निर्णायक विचारधारा जपण्यासाठी तू आतल्या मनाशी बोलतोस तेव्हा जे समजते आणि ज्या मनाचे ऐकून निर्णय प्रक्रिया अवलंबतोस ते दुसरे तिसरे काही नाही, तीच तुझी मनोदेवता असते.

मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ ज्ञानमय आहे. विवेक म्हणजे ज्ञानविचार. ब्रह्माची जाणीव विवेकातूनच करून घेतली तरच आपल्याला ब्रह्मप्राप्तीचा अनुभव येईल. तो कसा होईल? तो पूर्वी नव्हता काय ? हे विचार करू नको.याचे कारण चौर्‍याऐंशी लक्ष योनी व तीन खाणीतून फिरता फिरता याचा विसर पडला. मूळ स्वरुपाशी जाऊन मिळावे ही तळमळ तुला वाटते. तुझ्याच मूळ स्वरुपातून इथपर्यंतचा प्रवास सहज स्थितीतून झाला. फिरत फिरत तू इथे पोहोचलास पण तिथेच तुझी माझी चुकामूक झाली.

मायेच्या मोहाच्या पसार्‍यात तू लपेटलेला आहेस. नीट लक्ष दे आणि ऐक.ज्या दिवशी जन्मलास तो पहिला दिवस. याच्या अगोदर तू नऊ महिने गर्भात होतास. त्याच्या आधी आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन व एक महिना असा होतो. त्यात पुन्हा तीस दिवस. याप्रमाणे पहिल्या दिवशी अगदी बिंदूरुप! त्याही अगोदर झाडात, फळात, फुलात, फुलातल्या बियांत तू जीव होतास. त्याच्याही आधी पाण्याच्या थेंबात, थेंबाच्याही अगोदर वायूत, वायूच्याही अगोदर आकाशात, त्याही आधी तो त्या ध्वनीत, ध्वनीच्याही आधी परमाणू स्वरुपात. 

परमाणू परमेश्‍वर हेच प्रेमप्रभू असे खरे तुझे स्वरुप आहे. ज्यांच्यावर प्रेम करतोस ते असार आहे. हे कधीही विसरू नकोस. मनुष्यजन्म हा एकदाच मिळणारा सर्वश्रेष्ठ असाच आहे. त्यामुळे त्या जन्माचे सार्थक कर.