Tue, May 21, 2019 00:31होमपेज › Konkan › प्रभाते मनी : शिळ्या कढीला ऊत  

प्रभाते मनी : शिळ्या कढीला ऊत  

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:47PM
चिपळूण : समीर जाधव

कांदा, मुळा, भाजी आपल्या नित्याचीच गोष्ट आहे. मात्र, सध्या चिपळूण शहरात भाजी मंडईवरून शिळ्या कढीला ऊत काढण्याचा प्रकार सुरू  आहे. दहा वर्षांपूर्वी कोकणातील प्रसिद्ध महर्षि अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई नव्याने बांधकामासाठी पाडली. त्यानंतर नवीन उभारण्यात आली मात्र, अजूनही या इमारतीचा वनवास संपलेला नाही. स्थानिक कुरघोड्यांचे राजकारण शहर विकासाचा बळी घेत आहे. मागील 15 वर्षे शहर विकासात मागे गेले आता तरी निदान शहर विकासासाठी राजकीय पुढार्‍यांनी सकारात्मक विचार करावा आणि विकासाला साथ द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.

भाजपतून नगराध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेल्या सुरेखा खेराडे यांच्याकडून चिपळूणवासीय विकासाची अपेक्षा ठेवून आहेत. याचसाठी शहरवासीयांनी सत्तेचा वेगळा पर्याय निवडला. त्यामुळे नागरिकांच्या या सत्ताधार्‍यांकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. याची जाणीव ठेवूनच न. प. चा कारभार चालायला हवा ही माफक अपेक्षा आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या प्रमाणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम दरवर्षी राबविली जाते. यात फारसे नवीन काही नाही. चिपळूणवासीयांना याची सवय आहे. मात्र, हे माहीत असून देखील भाजी व्यावसायिकांनी हा विषय लावून धरला. या मागचा हेतू अधिक स्पष्ट होणे आवश्यक आहे. भाजी व्यापार्‍यांमध्ये काही माजी नगरसेवक आहेत. या संघटनेचे नेते सुधीर शिंदे हे तर विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांना सगळा विषय माहीत आहे. कारण ते पालिकेच्या सभागृहात बसतात. त्यामुळे हा विषय त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून यशस्वीपणे हाताळणे गरजेचे होेते. असे झाले असते तर भाजी व्यावसायिकांना दोन दिवस बंद व्यवसाय करावा लागला नसता. पालिकेने मंडईचे ओटे आणि गाळ्यासाठी लिलाव लावला. मात्र, या लिलावात भाजी व्यावसायिकांनी भाग घेतला नाही. अजूनही  लिलावात भाजी व्यापार्‍यांनी भाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा करीत आहेत. याचे गांभीर्य भाजी व्यावसायिकांनी लक्षात घ्यायला हवे आणि पालिकेचे ट्रस्टी म्हणून शिंदे यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घ्यायला हवा. भाजी व्यावसायिक आणि पालिका यांच्यात समन्वय घालण्याची नैतिक जबाबदारी शिंदे यांचीच अधिक आहे.

जर नागरिक पालिकेकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत असतील तर पालिकेला विकासासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी नगरसेवकांचीच...! अन्यथा पुन्हा एकदा पाच वर्षे अशीच राजकारण करण्यात जातील आणि शहर पुन्हा एकदा मागे पडेल. आता शिळ्या झालेल्या ‘भाजी’ला कितीवेळा गरम करणार? त्यापेक्षा या विषयात मार्ग काढून हा विषय संपवायला हवा. त्याचवेळी भाजी व्यापार्‍यांचे नेते म्हणून सुधीर शिंदे यांना अधिक मानसन्मान मिळेल.

या सत्ताधार्‍यांकडून मोठी अपेक्षा म्हणजे रखडलेली कामे मार्गी लागावीत. त्यात मुख्य म्हणजे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मच्छी मार्केट, मंडई, अग्निशमन केंद्र, ग्रॅव्हिटीची पाणी योजना अशी विकासकामांची यादी असताना ही रखडलेली कामे पूर्ण करून काही नवे प्रकल्प शहरासाठी हवे आहेत. यामध्ये भोगाळे रस्त्याचे दुपदरीकरण, शहरातील चौक सुशोभिकरण, उद्यानांचा नव्याने विकास, चिंचनाका ते बहादूरशेख नाका रस्त्याचे दुपदरीकरण असे नवे प्रकल्प हाती घ्यायला हवेत. तरच शहराचा चेहरा मोहरा बदलेल. चिपळूणचे सुदैव म्हणजे हे शहर मध्यवर्ती आहे. आता मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण याच शहरातून होत आहे. कोकण रेल्वे आणि आता चिपळूण-कराड रेल्वे येथूनच जात आहे. याचा फायदा शहर विकासासाठी करून घेणे गरजेचे आहे.