Sun, Jun 16, 2019 12:23
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › #Women’sDayयुवतींची आयडॉल प्रियदर्शनी जागुष्टे

#Women’sDayयुवतींची आयडॉल प्रियदर्शनी जागुष्टे

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:43PMरत्नागिरीतील पॉवरलिफ्टर प्रियदर्शनी जागुष्टे हिने राज्यातील क्रीडा क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला आहे. या यशामुळे ती युवतींची ‘आयडॉल’ बनली आहे.

राज्य शासनातर्फे 2012 ते 13 या वर्षासाठी तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नजीकच्या पाच वर्षांत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  स्तरावर केलेल्या कामगिरीच्या निकषावर हा पुरस्कार देण्यात येतो. याआधी पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेसमध्ये संपदा धोपटकर हिने हा पुरस्कार पटकावण्याची कामगिरी केली होती. आजवरच्या कारकिर्दीत प्रियदर्शनीने राज्य, राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही डोळे दीपवणारी कामगिरी करून दाखवली आहे. विशेषतः डेडलिफ्टमध्ये 260 तसेच डेडलिफ्ट, बेंचप्रेस, स्क्‍वॉट असे एकूण 535 कि.ग्रॅ. इतके वजन उचलण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

आजवर अनेकदा ‘स्ट्राँग वूमन महाराष्ट्र’ व ‘स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया’ या किताबाने तिला गौरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2009 च्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकासह स्ट्राँग गर्ल ऑफ कॉमनवेल्थ, ज्युनियर एशियन 2012 मध्ये 4 सुवर्णपदके, सुब्रतो दत्ता क्लासिक इंटरनॅशनलमध्ये 2 सुवर्ण व 1 रौप्य पदकाची कमाई केली आहे. सीनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत 3 सुवर्णासह 7 पदके, यात पुन्हा ‘स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया’, ज्युनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 3 सुवर्ण, यात दोनवेळा ‘स्ट्राँग गर्ल ऑफ इंडिया’, सीनियर राष्ट्रीय डेडलिफ्ट स्पर्धा, यात दोन सुवर्ण व एक स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया, ऑल इंडिया, फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण, यात एकदा ‘स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया’, ऑलइंडिया इंटरयुनिव्हर्सिटी पॉवरलिफ्टिंग स्पर्धा, सलग 3 वर्षे सुवर्णपदकांसहित ‘स्ट्राँग वूमन ऑफ ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी’ हा किताब तिने पटकावला आहे.

राष्ट्रीय स्तराप्रमाणेच राज्य पातळीवरही तिने अशीच चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. यामध्ये सीनियर राज्य पॉवरालिफ्टिंग स्पर्धेत 5 सुवर्ण, 1 कांस्य तसेच 3 वर्षे ‘स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र’ किताब, ज्युनियर राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 4 सुवर्ण पदकांसहित 4 वर्षे ‘स्ट्राँग गर्ल ऑफ महाराष्ट्र’ तसेच सबज्युनियर राज्य स्पर्धेतही तिने सुवर्णपदकांसह ‘स्ट्राँग वूमन’चा किताब पटकावला आहे.