Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Konkan › रेशन दुकानदारांचे आंदोलन स्थगित

रेशन दुकानदारांचे आंदोलन स्थगित

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:09AMरत्नागिरी : प्रतिनिधी

धान्य वितरणाबरोबरच धान्य वितरण प्रणालीत कार्यान्वित करण्यात आलेली ‘पॉस’ यंत्रणा सुरळीत करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे सल्लागार अशोक जाधव यांनी दिली.

हे आंदोलन 1 मेपासून करण्यात येणार होते. नंतर या आंदोलनाची सुरुवात 5 मेपासून करण्याचा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या  आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिनियमन जारी करण्यात आले आहेत. तसेच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीची आचारसंहिता, कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहवी, यासाठी या आंदोलन मागे घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देताना रेशन दुकानदारांच्या मागणीबाबत सकारात्मकता दाखविण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे दुकानदारांनी जाहीर केलेले हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याचे दुकानदार संघटनेने शनिवारी स्पष्ट केले आहे.

मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मकता दाखविताना पॉस मशिनमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुरवठा विभागाला सूचित केले आहे. तसेच धान्य पुरवठ्याबाबत राज्यस्तरावर निर्णय प्रलंबित असल्याने यासाठी करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आले आल्याचे जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने शनिवारी जाहीर केले आहे.